औरंगाबाद : शहरात यापुढे एकही सिमेंट रस्ता तयार न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या तिजोरीतून ५० कोटी रुपये खर्च करून काही डांबरी रस्ते तयार करण्यात येणार आहेत. या कामासाठी अंदाजपत्रक तयार केले असून, प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडून मंजुरी मिळताच निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शहरातील जुन्या डांबर लॉबीला पुन्हा एकदा चांगले दिवस येणार आहेत.
शहरातील रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून सुरुवातीला २५ कोटींच्या निधीतून ५ रस्त्यांची कामे करण्यात आली. त्यानंतर, १०० कोटींच्या निधीतून ३० रस्त्यांची आणि आता १५२ कोटींच्या निधीतून २३ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. आतापर्यंत ५८ रस्त्यांची कामे पूर्ण होत असल्याने, शहरातील मुख्य रस्त्यांची बहुतांश कामे मार्गी लागली आहेत, तसेच मागील पाच वर्षांत नगरसेवकांनी मनपा निधीतून वॉर्डातील रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत, तरीही मुख्य रस्त्यांची काही कामे अजूनही शिल्लक आहेत. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी नगरविकास विभागाच्या सूचनेनुसार शहरात एकही नवीन सिमेंट रस्ता न तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनपा निधीतून रस्त्यांसाठी डीपीआर तयार करण्याचे आदेश मनपा प्रशासक यांनी शहर अभियंता यांना दिले. त्यानुसार, शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी महापालिकेच्या ५० कोटींच्या निधीतून केल्या जाणाऱ्या रस्त्यांचा डीपीआर तयार केला असून, आठवडाभरात आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार असल्याचे सांगितले. मनपाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये रस्त्यांच्या कामासाठी ५० कोटींच्या निधीची तरतूद केली जाणार आहे.
महापालिका एनओसी देणार नाही
आमदार निधी, खासदार निधी आणि शासनाकडून विशेष अनुदान आणून शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. भविष्यात महापालिका या कामांसाठी ना हरकत प्रमाणपत्र देणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.