आळंद : तब्बल दीड वर्षानंतर मुहूर्त लागलेल्या राष्ट्रीय महामार्ग ते बोरगाव अर्ज रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला शनिवारी ठेकेदाराने प्रारंभ केला. मात्र, डांबरीकरणाच्या कामात पहिल्याच दिवशी ठेकेदाराकडून डांबरटपणा करण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्त्याचे काम बंद पाडले.
औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील आळंदजवळील बोरगाव अर्ज रस्त्याच्या कामाचे खडीकरण होऊन जवळपास दीड वर्षाचा कालावधी उलटला. डांबरीकरणाचे काम रखडले होते. ठेकेदाराने रखडलेल्या डांबरीकरणाच्या कामाला शनिवारी सुरुवात केली. मात्र, डांबरीकरण करण्याआधी रस्त्याची साफसफाई न करता मातीमिश्रित रस्त्यावर डांबर ओतण्याचे काम सुरू केले. थातूरमातूर काम करण्याचा सपाटा सुरू केला होता. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच पिंपरीचे माजी सरपंच रामेश्वर पवार, मंगेश साबळे, बाबूराव डकले, भाऊसाहेब चोपडे, सय्यद अजहर, रोहिदास डकले या स्थानिकांनी दर्जाहीन कामाला विरोध केला. ठेकेदार घटनास्थळी उपस्थित नव्हता. कामगारांनी ग्रामस्थांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. अखेर संतप्त ग्रामस्थांनी हे काम थांबविले. कामाच्या ठिकाणी बांधकाम विभागाचे अभियंता हजर असणे बंधनकारक आहे. तरी देखील कोणीही निरीक्षक येथे नव्हता.
----
दर्जात्मक काम केले जाईल
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता साहेबराव जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, मी आजारी असल्याने अजून दोन दिवस सुटीवर आहे. सोमवारी प्रत्यक्ष कामावर येऊन ठेकेदाराकडून चांगल्या दर्जाचे काम करून घेण्यात येईल, असे सांगितले.
फोटो : राष्ट्रीय महामार्ग ते बोरगाव अर्ज रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले.