औरंगाबाद : रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांसह महिलेस मारहाण करणाऱ्या व्यक्तीला वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या समोर नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. त्याचवेळी सिडको पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मद्यधुंद व्यक्तीला ताब्यात घेत ठाण्यात आणले. त्याच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.
उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोच्या कार्यालयाच्या समोर राजु जाधव (रा. राजनगर, मुकुंदवाडी) हा रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांसह महिलांना दगडाने मारहाण करीत होता. वर्षा डोंगरे या महिलेला एन १ चौकात मद्यधुंद जाधव याने बेदम मारहाण केली. त्यानंतर तो तेथून सिडको उड्डाणपुलाच्या दिशेने पळत आला. येताना नागरिकांवर दगड फेकत होता. त्यात काही जणांना किरकोळ लागले होते. तो पळून जात असतानाच नागरिकांनी वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या जवळ त्यास पकडण्यात आले.
त्याठिकाणी नागरिकांनी राजू जाधव यास बेदम चोपले. त्याचेवेळी सिडको ठाण्याचे उपनिरीक्षक कैलास अन्नलदास हे पथकास घटनास्थळी पोहचले. त्यांनी मारहाण करण्यात येत असलेल्या जाधव यास पोलिसांच्या गाडीत बसवले. तसेच उपस्थितांकडून माहिती घेतली. त्यानंतर पकडलेल्या जाधव यास सिडको ठाण्यात आले. त्याठिकाणाहुन वैद्यकीय तपासणीसाठी घाटीत पाठवले. तेव्हा त्याने नशा केल्याचे स्पष्ट झाले. तसेच मारहाणीत जखमी झालेल्या वर्षा डोंगरे यांनाही वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी माहिती निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.