लोकमत न्यूज नेटवर्क बीड : सततचा दुष्काळ अन् नापिकी यातून आलेल्या नैराश्यापोटी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे आर्थिक पुनर्वसन करण्याचा यक्षप्रश्न सर्वांसमोर आहे. मात्र, केज तालुक्यातील जनविकास सामाजिक संस्था व केरिंग फ्रेंडस् मुंबई या संस्थांनी पुढे येऊन बीड जिल्ह्यातील ५० वर आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना उद्योगधंदे उभारण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. ही बाब शासनासह प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत आहे. २०१७ मध्ये आतापर्यंत बीड जिल्ह्यात ५५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नैराश्यातून मृत्यूला कवटाळले आहे. घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना प्रचंड हाल सहन करावे लागतात. मुलांचे शिक्षण बंद पडते, या सर्व स्थितीवर अभ्यास करून केज येथील रमेश भिसे यांनी जनविकास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना उद्योगधंदे उभे करण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीला संपूर्ण संसाराचा गाडा ओढावा लागतो. ओढवलेली परिस्थिती पाहून नातेवाईकदेखील दुरावतात, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, रमेश भिसे यांनी ५० वर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना छोटे छोटे उद्योग सुरू करून दिले. यामध्ये केज तालुक्यातील भाटुंबा येथील अशोक सटवाराम धपाटे या शेतकऱ्याने वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी व शेतीतील पेरणीसाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. सततच्या दुष्काळामुळे कर्जाचा बोजा वाढतच गेला व त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, बायको, दोन मुले असा परिवार सांभाळायचा कसा, हा प्रश्न निर्माण झाला. यावर उपाय म्हणून जनविकास सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना पिठाची गिरणीसाठी अर्थसाह्य केले. यामुळे या कुटुंबियाला उदरनिर्वाहाचे साधन मिळाले. आजघडीला त्यांची या गिरणीवरच गुजराण सुरू आहे. यासारखे अनेक उदाहरणे आहेत. ज्या कुटुंबियांचे पुनर्वसन जनविकास सामाजिक संस्थेच्या मदतीने होऊ शकले. यामध्ये चंदनसावरगाव येथील उद्धव तपसे यांच्या कुटुंबियांना शेळ्या-मेंढ्या घेण्यासाठी अर्थसाह्य करण्यात आले. ढाकेफळ येथील रामेश्वर मारुती जाधव या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना म्हैस घेऊन दिली. दुग्धव्यवसायामुळे या कुटुंबातील मुले शाळेत जात आहेत. मिळालेल्या आधाराबद्दल आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.
आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना जनविकासचा हातभार
By admin | Published: May 08, 2017 12:22 AM