औरंगाबाद : मराठवाड्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील १८ हजार स्थलांतरित मजूर, नागरिकांना १० रेल्वेद्वारे मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे रवाना करण्यात आले. त्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाला प्रचंड तारेवरची कसरत करावी लागली. रेल्वे जाणार त्यादिवशी पहाटे ५ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत महसूल, पोलीस आणि रेल्वे प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्ण दिवस हजारोंच्या गर्दीत जीव धोक्यात घालून काम केले. ही गर्दी हाताळताना प्रशासनाने आरोग्याची पूर्ण काळजी घेतल्याने सुदैवाने एकाही अधिकारी, कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली नाही.
औरंगाबाद स्थानकावरून ७ मेपासून २३ मेपर्यंत १० रेल्वे सोडण्यात आल्या. यामध्ये मध्यप्रदेशसाठी २, उत्तर प्रदेशासाठी ४, झारखंडसाठी २ आणि बिहारसाठी २, अशा १० रेल्वेंचा समावेश होता. ७ तारखेपासून २३ मेपर्यंतचा पूर्ण काळ नियोजनात गेल्यामुळे २४ मे रोजी रविवारी महसूल, पोलीस यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.
ऐनवेळी वाढायची मजुरांची संख्यामराठवाड्यासह आसपासच्या जिल्ह्यातील स्थलांतरित नागरिकांना रेल्वेस्थानकावरून पाठविण्यात आले. संबंधित जिल्हा प्रशासन २०० नागरिकांचे नियोजन आदल्या दिवशी करीत असे; परंतु पाठविताना ३०० ते ४०० नागरिकांना पाठवीत असे. त्यामुळे रेल्वेत सोशल डिस्टन्सिंग पाळून मजुरांना पाठविण्याची अडचण येत असे. परिणामी, अनेकांना एक-दोन दिवस अयोध्यानगरीच्या मैदानावरच सांभाळावे लागले. यामध्ये पोलीस यंत्रणेला प्रचंड ताण सहन करावा लागला, तर महसूल प्रशासनाला रात्रभर थांबलेल्या मजुरांची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी धावपळ करावी लागली, असे अप्पर तहसीलदार किशोर देशमुख यांनी सांगितले.
२०० हून अधिक कर्मचाऱ्यांची टीम२३ मे रोजी दहावी रेल्वे बिहारमधील मुज्जफरनगरला रवाना झाली. ७ मेपासून शनिवार २३ मेपर्यंत २०० हून अधिक महसूल, पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी स्थलांतरितांना पाठविण्यासाठी व्यस्त होते. उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, पोलीस उपायुक्त नीकेश खाटमोडे, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, अप्पर तहसीलदार किशोर देशमुख यांच्यासह तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी हजारो नागरिकांना सुखरूप पाठविण्यासाठी परिश्रम घेतले.
१८ तास काढले रेल्वेस्थानकावरअप्पर तहसीलदार देशमुख म्हणाले, एकेका दिवशी १८ तास रेल्वेस्थानकावरच काढावे लागले. समन्वयक अधिकारी डॉ. बाणापुरे, उपायुक्त खाटमोडे आदींसह पूर्ण टीम रेल्वेस्थानकावर कार्यरत होती. किरकोळ अपवाद वगळता रेल्वेस्थानकावर कोणतीही वादग्रस्त घटना झाली नाही. शिस्तीने आणि नियोजनाने प्रत्येकाला दिवसभर पुरेल एवढे अन्न, पाणी सोबत देऊन पाठविले. शनिवारी शेवटची रेल्वे रवाना झाल्यानंतर मोठ्या जबाबदारीतून बाहेर पडल्याचे सध्या जाणवत असल्याचे देशमुख म्हणाले.