औरंगाबाद : जगातील चार मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक असलेल्या फ्रान्सच्या टोटल एनर्जीज् कंपनीने औरंगाबादेत गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली आहे. शहरात जैव-ऊर्जा प्रकल्पात गुंतवणूक करण्याचा कंपनीचा विचार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने बुधवारी दिली.
कंपनीने औरंगाबाद शहरातील सोयीसुविधांचा आढावा घेतला. महापालिका प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी टीमशी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाइन संवाद साधला. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार टोटल एनर्जींज् यांनी इन्व्हेस्ट इंडियाच्या माध्यमातून औरंगाबाद स्मार्ट सिटीशी संपर्क साधला होता. त्यानुसार या ऑनलाइन बैठकीत पालिका प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, स्मार्ट सिटीचे आदित्य तिवारी, टोटल एनर्जीज्चे ज्यूल डिऔर, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे प्रताप मोंगा आणि इन्व्हेस्ट इंडियाचे वेदांत राज सहभागी झाले होते.
याप्रसंगी पालिका आयुक्त पाण्डेय म्हणाले की, औरंगाबाद व मराठवाडा भाग सातत्याने दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेती करणारे लोक मोठ्या प्रमाणात पशुधनावर अवलंबून आहेत. कडक उन्हाळ्यात मराठवाड्यात वेगवेगळ्या भागात जनावरांसाठी चारा छावण्या उभाण्यात येतात. ज्या जैव ऊर्जा उत्पादनासाठी बायोमासचा चांगला स्रोत ठरू शकतील. जैव ऊर्जा ही वायू प्रदूषण कमी करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात मदत करू शकते. कारण जैव ऊर्जा उत्पादनासाठी शेतातील अवशेष कच्चा माल म्हणून वापरता येतील, असे तिवारी म्हणाले. महापालिका प्रशासन आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीने सादर केलेल्या सादरीकरणामुळे एकूण गुंतवणूकीसाठी सकारात्मक संकेत देण्यात आले. औरंगाबाद शहरात मागील काही वर्षांमध्ये तयार झालेल्या पायाभूत सविधा, औद्योगिक कंपन्यांसाठी असलेले पोषक वातावरण आदींची माहिती देण्यात आली.
औरंगाबाद- फ्रान्स संबंधाचा इतिहाससादरीकरणादरम्यान औरंगाबाद स्मार्ट सिटीने इंडो-फ्रेंच संबंधांवर प्रकाश टाकण्यात आला. १६५३ साली फ्रेंच प्रवासी आणि हिरे व्यापारी ट्रॅव्हिएनर औरंगाबादला आले होते. त्यांनी बीबी का मकबराच्या बांधकामासाठीची वाहतूक जवळून बघितली होती. औरंगाबादची श्रीमंती आणि वैश्विक संस्कृती पाहून ते चकित झाले होते. भारत आणि फ्रान्सची विविध क्षेत्रातील भागीदारी, ऊर्जा संबंध आणि सांस्कृतिक संबंध यासह अन्य विषयांवर या संवाद कार्यक्रमात चर्चा झाली.