औरंगाबाद : साध्या डोळ्यांनी पटकन दिसणारा चंद्र प्रत्यक्षात कसा दिसत असेल, हे दुर्बिणीतून पाहताना शनिवारी लहान-मोठे सगळेच खगोलप्रेमी हरवून गेले. चंद्रावरचे छोटे-छोटे खड्डे प्रत्यक्षात अख्खी गावच्या गावे सामावून जातील इतके मोठे आहेत, हे जाणून प्रत्येक जण अचंबित होत होता. चंद्राच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करताना विश्वाच्या पसऱ्याचाही अंदाज आला. निमित्त होते आंतरराष्ट्रीय चंद्र महोत्सवाचे.मानव चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेल्या प्रथम घटनेचे २०१८-२०१९ हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त एमजीएम परिसरातील एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्रात शनिवारी सायंकाळी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. एमजीएम संस्थेचे सचिव अंकुशराव कदम यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी अनुराधा अंकुशराव कदम, विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर, समन्वयक भाग्यश्री केंढे, अशोक क्षीरसागर यांची उपस्थिती होती. यानिमित्त मोठ्या दुर्बिणीद्वारे चंद्राचा पृष्ठभाग पाहण्याची ही अनोख मेजवानी औरंगाबादकरांना मिळाली. विद्यार्थी, पालक, विज्ञानप्रेमी, खगोलप्रेमींंनी मोठ्या संख्येने महोत्सवाला हजेरी लावत चंद्र निरीक्षणाची पर्वणी साधली.यावेळी चंद्रासह नासाच्या ‘एलआरओ’ आणि भारताच्या इस्रोच्या आगामी चंद्रयान-२ या चंद्र्रयानाबद्दल माहिती देण्यात आली. नागरिकांनी विचारलेल्या शंकांचे निराकरणही करण्यात आले. विज्ञान केंद्रातर्फे अपोलो-११ चंद्र मोहिमेद्वारे चंद्र्र पृष्ठभागावर उतरलेल्या ‘ईगल’ चंद्र यानाची विशेष प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या ‘ईगल’ चंद्र यानाचेही लोकार्पण झाले.चंद्र यान, ग्रहासोबत सेल्फीविज्ञान केंद्र परिसरात चंद्र पृष्ठभागावर उतरलेले ईगल-चंद्र यान, आय लव्ह सायन्स व शनी ग्रहाची प्रतिकृती, असे तीन सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले होते. याठिकाणी प्रत्येक जण सेल्फी काढून हा क्षण मोबाईलमध्ये कैद करीत होता.
चंद्राच्या दुनियेत हरवले खगोलप्रेमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 10:49 PM
साध्या डोळ्यांनी पटकन दिसणारा चंद्र प्रत्यक्षात कसा दिसत असेल, हे दुर्बिणीतून पाहताना शनिवारी लहान-मोठे सगळेच खगोलप्रेमी हरवून गेले.
ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय चंद्र महोत्सव : विद्यार्थी, पालकांसह विज्ञानप्रेमींंची उपस्थिती