छत्रपती संभाजीनगर : बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज क्रांती चौक येथे शिवसेनेतर्फे (उद्धवजी बाळासाहेब ठाकरे) निदर्शने करण्यात आली. यावेळी टरबूज फोडून आणि बांगड्या फेकून निषेध करण्यात आला.
चिमुकल्या मुलींवर शाळेत अत्याचाराची घटना बदलापूर येथे उघडकीस आली आहे. यामुळे काल मंगळवारी बदलापूर येथे नागरिकांनी संबंधित शाळेत निदर्शने केली, तसेच रेल्वे स्टेशन बंद करून नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला. दरम्यान, या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय पक्षांनी देखील आरोपीस कडक शिक्षेची मागणी केली आहे. आज सकाळी या प्रकरणी ठाकरे गटाच्या शिवसनेने क्रांती चौकात आंदोलन केले. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीस गृहमंत्री जबाबदार असल्याचा आरोप करत आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आक्रमक आंदोलकांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याच्या घोषणा देत टरबुज फोडत आणि बांगड्या फेकत या घटनेचा निषेध केला. यावेळी उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, महानगरप्रमख राजू वैद्य ,शहरप्रमुख विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, राजू शिंदे, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणा देत या घटनेचा निषेध करण्यात आला. टरबूज फेकण्यात आली. महिलांनी पायांनी टरबूज तुडवली