छत्रपती संभाजीनगर : विजयादशमी दिनी बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन धम्मचक्र गतिमान केले. या ऐतिहासिक दिनाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी बुद्धलेणीच्या पायथ्याशी धम्मभूमीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह आजूबाजूंच्या जिल्ह्यांतील हजारो बौद्ध बांधव दाखल झाले आहेत.आज जपान, थायलंड येथील बौद्ध भिक्खू यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यासाठी धम्मभूमीत भीमसागर उसळला आहे.
लेणीच्या पायथ्याशी असलेल्या धम्मभूमीत अभिवादन कार्यक्रमासाठी भव्य व्यासपीठ थाटण्यात आले असून परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी बुद्ध- फुले- शाहू- आंबेडकर या महामानवांच्या विचार, कार्य आणि कर्तृत्वाच्या पुस्तकांची दालने, प्रतिमा, झेंडे विक्रीचे स्टॉल, विविध संघटनांचे अन्नदानाचे स्टॉल लागले आहेत. पहाटेपासूनच बौद्ध अनुयायी शुभ्र वस्त्र परिधान करून येथे अभिवादनासाठी दाखल झाले. पहाटे ४ ते ६ वाजेपर्यंत श्रामणेरांसाठी परित्राण पाठ घेण्यात आले. त्यानंतर सकाळी ७ वाजता धम्मध्वजारोहण, ८ वाजता परित्राण पाठ, त्रिशरण, पंचशील, पूजा पार पडली. त्यानंतर भिक्खुसंघाने अनुयायांना धम्मदेशना दिली.