छत्रपती संभाजीनगर : रामनवमी व हनुमान जयंती हे सण लवकरच येत आहेत. याआधीच बाजारात रामफळ विक्रीला आले आहे. मात्र, अस्सल खवय्यांना प्रतीक्षा आहे, ती हनुमानफळाची. फळांचा राजा आंब्याची कमतरता होती; पण आता ती भरून निघाली आहे. बाजारात हापूस, लालबाग, पायरी आंबे मिळत आहेत.
रामनवमीला रामफळ खरेदी करून मंदिरात रामाच्या मूर्ती समोर अर्पण करीत असतात. मात्र, आता खवय्यांना या रामफळाची महती कळू लागल्याने आवर्जून रामफळ खरेदी केले जात आहे. साधारणत: हृदयासारख्या आकाराचे, पिवळट, लालसर, थोडेसे हिरवट व चवीला ‘गोड’ रामफळाची विक्री हातोहात होत असते. जिथले पेरू व सीताफळ प्रसिद्ध आहे, त्याच दौलताबादमधून ‘रामफळ’ विक्रीला आले आहेत.
भाव मिळतोय १२० रुपये किलोबाजारात १०० ते १२० रुपये किलोने रामफळ विकले जात आहे. एका किलोत दोन ते तीन रामफळे बसतात. या भावातही ग्राहक रामफळ खरेदी करीत आहेत.
रामफळाचे वैशिष्ट्यआहारतज्ज्ञांनी सांगितले की, रामफळातून शरीराला ‘सी’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळते. याशिवाय कॅल्शियम, फॉस्फरस, मॅगेनिज, पोटॅशियम ही पोषक द्रव्ये मिळतात.
हनुमानफळाचा आकार मोठाहनुमान जयंतीच्या आधी हनुमानफळ बाजारात येईल, असे व्यापारी सांगत आहेत. चवीला आंबड गोड, मऊ गर आणि ओबडधोबड आकारातील हे फळ वजनानेही तेवढेच जड असते. एका फळाचे वजन १ ते दीड किलोपर्यंत असते. तसे सीताफळ आणि रामफळाचे हनुमानफळ हे कॉम्बिनेशन आहे. विशेष म्हणजे या फळात बियांचे प्रमाण कमी असते. तसेच मऊ गर असल्याने ते आइस्क्रीमसारखे चमच्याने खाता येते. मागील वर्षी ७० ते ८० रुपयांना हे फळ विक्री झाले होते. यंदाही तोच भाव राहील, असे व्यापाऱ्यांनी नमूद केले. पूर्वी ग्राहक हे फळ खरेदी करत नव्हते; पण आता त्याची चव खवय्यांना आवडल्याने हनुमानफळ बाजारात कधी येणार, अशी विचारणा ग्राहक करीत आहेत.