औरंगाबाद : जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधीर देशपांडे (आबासाहेब) यांनी अटलजींचा एक किस्सा सांगितला. शहरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अटलजी आले होते. पुढील प्रवास ते रेल्वेने करणार होते. फ्रेश होण्यासाठी त्यांना माझ्या घरी न्यायचे होते. त्यावेळेस माझ्याकडे अॅम्बेसिडर कार होती. त्या कारमधून सकाळी त्यांना घरी आणले. त्यांनी नाश्ता केला. पुढील प्रवास रेल्वेने करायचा असल्याने मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी होईल, हे लक्षात घेऊन चिकलठाणा रेल्वेस्टेशन येथून त्यांचे तिकीट काढले होते.
शॉर्टकटने जाण्यासाठी मी कार थेट चिकलठाणा विमानतळाच्या रनवेवरून नेली. पलीकडे रस्ता खूप खराब होता. कार खड्ड्यातून आदळत गेली. तेव्हा गाडी सावकाश चालव, असे अटलजी मला थेट म्हणाले नाहीत; पण त्यांनी आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्यातून ते सुचविले. अटलजी गाणे गातच म्हणाले, ‘ये रास्ते हैं प्यार के, चलना संभल संभल के’. त्यानंतर मी आयुष्यात कधी कार अतिवेगाने चालविली नाही.
‘ये चुनाव रॅली नही है’सुधीर देशपांडे यांनी सांगितले की, आणीबाणीनंतरच्या काळात अटलजी औरंगाबादेत आले होते. तेव्हा त्यांची लोकप्रियता वाढली होती. विमानतळावरून सुभेदारी गेस्ट हाऊसवर त्यांना नेण्यासाठी आम्ही १०० कार आणल्या होत्या. सर्व ताफा विमानतळावरून सुभेदारीकडे निघाला. पाठीमागे एवढ्या कार पाहून अटलजी म्हणाले, ‘ये क्या है, इतने कार क्यू लाये, मेरी चुनाव रॅली नहीं है’ तेव्हा मी त्यांना सांगितले, निवडणूक नसली तरी कार्यकर्ते स्वत:हून त्यांच्या स्वत:च्या कार घेऊन तुमच्या स्वागतासाठी आले आहेत. हे ऐकून अटलजी गालातल्या गालात हसले.
मागील डिसेंबरमध्येच शहरात साजरा झाला अटलजींचा वाढदिवसअटलबिहारी वाजपेयी यांचा ९३ वा वाढदिवस २५ डिसेंबर २०१७ रोजी शहरात साजरा करण्यात आला होता. जिल्हा परिषद रोडवरील सीमंत मंगल कार्यालयात यानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खास जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांपासून ते भाजपच्या आताच्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण या सोहळ्याला हजर होते. यानिमित्ताने अटलजींचे शहरवासीयांना लाभलेल्या सहवासावरील छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यावेळी अटलजींच्या आठवणीत सारे जण रमले होते. तेव्हा त्यांच्यासाठी दीर्घायुष्यासाठी सर्वांनी प्रार्थना केली होती आणि खास पत्रिकाही तयार करण्यात आली होती.
जन्माला आल्याचे सार्थक झाले...काही कामानिमित्त दिल्लीला आले असून, मला आज अटलजींना भेटायचेच आहे. त्यांना भेटल्याशिवाय मी मरणार नाही आणि त्यांनाही मरू देणार नाही’ हा निर्धारपूर्वक आवाज ऐकला आणि अटलबिहारी वाजपेयींचा तत्कालीन पीए अश्विनी क्षणभर गडगडला. तीन वर्षांपासून पिच्छा पुरविणारी ही बाई आज काही केल्या ऐकणार नाही, असे त्याला पक्के ठाऊक झाले. त्याने त्याच दिवशीची म्हणजे दि. १३ आॅक्टोबर २००३ या दिवशी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांची अटलजींची भेट पक्की केली आणि त्या भेटीने मी जन्माला आल्याचे सार्थक झाले, असे भावोद्गार डॉ. मंगला वैष्णव यांनी काढले.वाजपेयींसोबतच्या या अविस्मरणीय भेटीची आठवण सांगताना स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका तथा कवियित्री डॉ. मंगला वैष्णव यांचा उर दाटून आला होता. त्या म्हणाल्या की, ‘राजा भोज आणि गंगू तेली’ अशा स्वरूपाची असणारी ही भेट म्हणजे माझ्यासाठी अगदी दैवयोग आहे.
डॉ. वैष्णव यांना वाजपेयींच्या कविता वाचण्याचा छंद होता. १९९६ साली त्यांनी एका मित्राच्या सांगण्यावरून वाजपेयी यांच्या ‘रोते रोते रात सो गयी’ या कवितेचा सहज म्हणून अनुवाद केला आणि हळूहळू एकेक कविता करीत पुस्तकनिर्मिती झाली. पुस्तक प्रकाशनानंतर हा अनुवाद आता वाजपेयींना समर्पित करायचा, अशी डॉ. वैष्णव यांची दृढ इच्छा होती. त्यानुसार १९९८ पासून त्या वाजपेयी यांच्या भेटीसाठी प्रयत्नशील होत्या. तब्ब्ल पाच वर्षे पाठपुरावा केल्यानंतर शेवटी २००३ साली त्यांची भेट होऊ शकली. दहा मिनिटांसाठी ही भेट निश्चित करण्यात आली होती. डॉ. वैष्णव यांनी केलेला उत्कृष्ट अनुवाद पाहून वाजपेयी यांना मनापासून कौतुक वाटले आणि त्यांनी डॉ. वैष्णव यांना एकामागून एक अशा बऱ्याच कविता ऐकवायला लावल्या. १० मिनिटांची ही भेट ३५ मिनिटांपर्यंत लांबत गेली. डॉ. वैष्णव यांच्या पुस्तकावर वाजपेयी यांनी ‘काय लिहू’ असा अभिप्रायही लिहिला आहे. डॉ. वैष्णव म्हणाल्या की, वाजपेयी दिसायला अजिबात देखणे नव्हते; पण त्यांच्या विद्वत्तेच्या तेजाने डोळे अक्षरश: दिपून जात होते, वाजपेयींच्या भेटीने परब्रह्म भेटल्याचा साक्षात्कार झाला, असे त्यांनी नमूद केले.