छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अटल इन्क्युबेशन केंद्रात (एआयसी) मागील काही वर्षांपासून उद्योजक घडविण्यात येत आहेत. विद्यार्थी, युवकांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना बळ देण्याचे काम केंद्रातून केले जात आहे. त्यासाठी सीएसआर फंडातून आर्थिक मदतही करण्यात येत आहे. त्यामुळे अटल इन्क्युबेशन केंद्र हे उद्योजक घडविणारे केंद्र ठरत आहे.
विद्यापीठात एआयसी बामू फाउंडेशन या नावाने तरुणांच्या नवकल्पनांना संधी देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी निती आयोगासह राज्य शासनाने मदत केली आहे. त्याशिवाय खाजगी उद्योगांचाही सीएसआर फंड इन्क्युबेशन केंद्र सुरू करण्यासाठी वापरण्यात आला होता. सहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या केंद्रातून आता नवीन उद्योजक घडविले जात आहेत. आतापर्यंत ६० युवकांनी विविध प्रकारचे स्टार्टअप सुरू केले आहेत. त्याशिवाय मागील नवीन स्टार्टअपसाठी एचडीएफसी बँकेकडून २५ लाख रुपयांचा सीएसआर फंडही उपलब्ध झाला होता. चालू वर्षातही २० ते ३० स्टार्टअप सुरू करण्याचा प्रयत्न केंद्राकडून केला जात आहे. त्याशिवाय केंद्राकडून आयपी सेल, पीएच.डी. विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये स्टार्टअप यात्राही काढली जाणार आहे. या केंद्राला आतापर्यंत केंद्र शासनाच्या ई-युवा केंद्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून प्रशिक्षण देण्याचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.
दोन नवकल्पनांना फाॅरेन फंडिंगस्टार्टअर इंडिया सीड फंड (एसआयएसएफ) ही संस्था नवउद्योजकांना अनुदान आणि कर्ज मिळवून देणे अशा दोन प्रकारे मदत करते. या संस्थेमुळे तिघांना प्रत्येकी १५ लाखांपर्यंतचे कर्ज मिळाले, तर तिघांना प्रत्येकी ५ लाखांचे अनुदान मिळाले आहे. एचडीएफसी बँकेने त्यांच्या सीएसआरमधून दोन प्रकल्पांना मदत केली आहे. दोन प्रकल्पांना परकीय अर्थसाहाय्य मिळाले आहे. डॉ. आंबेडकर यंग आंत्रप्रेन्युअर्स लीगचा सहाजणांना फायदा झाला आहे. या संधी प्रत्येकाला मिळाल्या पाहिजेत त्यासाठी बुट कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे.