औरंगाबाद : इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणाऱ्या एथर एनर्जी या कंपनीने डीएमआयसीअंतर्गत येणाऱ्या बिडकीनमध्ये ८०० ते १ हजार कोटींतून प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. कंपनीच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी बुधवारी सीएमआयएच्या कार्यालयात चर्चा करून येथील सुविधांसह इंडस्ट्री इको सिस्टमचा आढावा घेतला. गुजरात, गुडगाव व औरंगाबाद या तीनपैकी औरंगाबादमधील बिडकीनमध्ये एथरने गुंतवणुकीबाबत सकारात्मक विचार केला आहे. मागील १५ दिवसांत चार वेळा एथरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे शिष्टमंडळ येथे येऊन गेल्यामुळे गुंतवणुकीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
५० एकर जागा सवलतीत मिळण्याची कंपनीची मागणी असून राज्य शासन २५ टक्के सवलती देऊ शकते. यासाठी उच्चस्तरीय पाठपुरावा होऊन जागेचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे.
१५ लाख ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) उत्पादन करण्याचे कंपनीचे लक्ष्य असून औरंगाबादमधील प्रकल्पांतून सुमारे ४ लाख वाहनांचे उद्दिष्ट समोर ठेवून कंपनी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. एथरच्या वरिष्ठांसमोर विभागातील इकोसिस्टमबद्दल सविस्तर सादरीकरण केले. एथर एनर्जी कंपनीच्या प्रतिनिधींनी येथील कुशल मनुष्यबळ आणि कंपनीसाठी हवे असेलेले पोषक वातावरण यांबाबत विचारणा केली. सीएमआयएच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत एथर एनर्जी प्रा. लि.चे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा उत्पादन विभागप्रमुख संजीव कुमार सिंग, सीएमआयएचे उपाध्यक्ष दुष्यंत पाटील, उद्योजक ऋषिकुमार बागला, प्रसाद कोकीळ, कमलेश धूत, रितेश मिश्रा, आदींची उपस्थिती होती.
गुंतवणूक करा, आम्ही सोबतएथरच्या अधिकाऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांना गुंतवणूक करा, सोबत राहण्याचे सीएमआयएने आश्वासित केले. युनियनचा त्रास होणार नाही. प्रकल्पाचे ऑफिस सीएमआयएच्या ऑफिसमध्ये सुरू करा. सर्व परवानग्यांसाठी पाठपुरावा करू, मंत्रालयापर्यंतच्या अडचणी सोडवू. शासनाकडे ज्या सबसिडी मागितल्या आहेत, त्यासाठी पाठपुरावा करू. येथे उद्योगांची ईको-सिस्टम आहे. इलेक्ट्रॉनिक क्लस्टरची सुविधा मिळण्याबाबत एथरच्या वरिष्ठांना आश्वासित केले.- दुष्यंत पाटील, सीएमआयए उपाध्यक्ष