छत्रपती संभाजीनगर : अथर एनर्जी या प्रख्यात भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनीने औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी अर्थात ऑरिकमध्ये तब्बल ८६५ कोटींच्या गुंतवणुकीस मान्यता दिली आहे. ही गुंतवणूक म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.
या गुंतवणुकीला बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत अधिकृत मंजुरी मिळाली आहे. अथर एनर्जी तिच्या प्रगत इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या उत्पादनासाठी ओळखली जाते. ही कंपनी भारतीय इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) बाजारपेठेतील प्रमुख स्पर्धक आहे. ऑरिकमधील गुंतवणुकीमुळे एक मजबूत गुंतवणूकदार यानिमित्ताने शहराला व राज्याला मिळाला असल्याने औद्योगिक क्षेत्रातील आशा पल्लवित झाल्या आहेत.
सीएमआयएच्या प्रयत्नांना फळ मिळाले : गुप्ताऑरिकमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सीएमआयएने केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर (सीएमआयए)चे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी म्हटले आहे. या गुंतवणुकीमुळे शहरातील औद्योगिक क्षेत्रात ईव्ही मार्केटची ओळख होईल आणि जिल्ह्यात अनेक छोट्यामोठ्या कंपन्यादेखील येतील. सीएमआयएने प्रस्तावित गुंतवणुकीबाबत अथर एनर्जीचे संस्थापक तरुण मेहता, सह-संस्थापक स्वप्निल जैन, उत्पादन प्रमुख संजीव कुमार सिंग आणि संचालक मुरली शसीधरम यांच्याशी चर्चा केली होती. ही भरीव गुंतवणूक शहरातच आणण्यासाठी सीएमआयए टीमने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशीही समन्वय साधला होता. अथर टीमने गुंतवणुकीची सोय करण्यासाठी ऑरिक प्रशासन आणि सीएमआयएच्या सक्रिय प्रयत्नांबद्दल त्यांचे कौतुकही केल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
ॲारिक सिटीला मिळणार बूस्टशहराच्या औद्योगिक क्षेत्रासाठी अथर एनर्जी प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टच्या गुंतवणुकीमुळे ऑरिक सिटीच बूस्ट होईल. औद्योगिक क्षेत्राची सर्वाधिक भरभराट होणार असल्याने उद्योजकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, असे ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी सांगितले. या गुंतवणुकीमुळे औद्योगिक क्षेत्रातील इतर युनिट्सला फायदा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
गोगोरो १२ हजार स्वॅपिंग स्टेशन उभारणारअथरच्या गुंतवणुकीसह आणखी एका महत्त्वपूर्ण घडामोडीत तैवानस्थित गोगोरो इंक या कंपनीने महाराष्ट्रात बॅटरी स्वॅपिंगसाठी पायाभूत सुविधा उभारण्यास तयारी दाखवली आहे. या दोघांच्या गुंतवणुकीमुळे ईव्ही आणि बॅटरी उत्पादनात तसेच स्वॅपिंग स्टेशनच्या उभारणीत समावेश असेल. गोगोरोने नजीकच्या काळात राज्यभर सुमारे १२ हजार स्वॅपिंग स्टेशन्स उभारणार असल्याचे म्हटले आहे. ज्यामुळे महाराष्ट्रात ईव्ही क्षेत्रात पायाभूत सुविधा देण्यास चालना मिळेल.
औरंगाबाद मिशन ग्रीन मोबिलिटीला मिळणार चालनाया दोन्ही प्रोजेक्टच्या येण्याने ‘औरंगाबाद मिशन ग्रीन मोबिलिटी’ (एएमजीएम) या उपक्रमाला चालना मिळणार आहे. हा उपक्रम म्हणजे ग्रीन मोबिलिटी, वायुप्रदूषण कमी करण्यासाठी, मराठवाडा ऑटो क्लस्टर (मॅक) आणि सीएमआयएने संयुक्तपणे औरंगाबाद मिशन ग्रीन मोबिलिटी उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमांतर्गतच १००० दुचाकी, २५० चार चाकी, ५० बस आणि ५०० तीन चाकी वाहनांसह ईव्ही वाहनांचे सादरीकरण शहरात करण्यात आले होते. या उपक्रमानेच शहराची ओळख ईव्ही वाहनांचे केंद्र म्हणून झाली होती. हाच उपक्रम अथर एनर्जीची गुंतवणूक आकर्षित करण्यास अधिक फायदेशीर ठरल्याचेही अधोरेखित होत आहे.