वाळूज महानगर: एटीएम कार्डाची अदला-बदल करुन बजाजनगरात व्यवसायिकास ८० हजारांचा गंडा घालणाऱ्याविरुध्द शनिवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील शिवाजी आश्रुबा मोहिते हे १३ फेब्रुवारीला ईलेक्ट्रिक साहित्य खरेदीसाठी औरंगाबादला आले होते. दुुसऱ्या दिवशी १४ फेब्रुवारीला सकाळी गावाकडील संतोष गुंजकर व त्यांच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी मोहिते हे रांजणगावात आले होते. मात्र, त्यांची भेट न झाल्यामुळे ते बजाजनगरच्या महाराणा प्रताप चौकातील एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी गेले होते. मात्र या केंद्रावर पैसे नसल्यामुळे मोहिते हे बजाजनगरच्या मोरे चौकातील एसबीआय बँकेच्या एटीएम केंद्रावर गेले होते. या ठिकाणी त्यांनी दोनदा मशिनमध्ये कार्ड टाकुन पैसे बाहेर निघण्याची प्रतीक्षा करीत होते. दरम्यान, एटीएम केंद्रात उभा असलेल्या एका मुलाने एटीम मशिनचे बटन दाबुन मोहिते यांच्या हातात एटीएम कार्ड देऊन तो निघुन गेला. यानंतर मोहिते हे पुन्हा बजाजनगरात पैसे काढण्यासाठी गेले होते. मात्र पैसे न निघाल्यामुळे ते आपल्या मूळगावी निघून गेले.
दुसºया दिवशी १५ फेब्रुवारीला मोहिते यांनी हिंगोली येथील एसबीआय बँकेत स्लीप भरुन ४० हजार रुपये काढले. यावेळी मोहिते यांनी आपल्या बँक खात्यात किती रक्कम जमा असल्याचे कर्मचाºयाकडे विचारणा केली. तेव्हा त्याने ९१ हजार ५०५ जमा असून, २० हजार रुपये दुसºयाच्या खात्यात जमा झाल्याचे सांगितले. यानंतर १८ फेब्रुवारीला मोहिते यांनी बँकेत जाऊन आपल्या खात्याची तपासणी केली असता त्यांना आपल्या खात्यात केवळ ५१ हजार ४५८ रुपये शिल्लक असल्याचे बँकेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले. आपण तर पैसे काढले नाही मग पैसे कुठे गेले असा सवाल उपस्थित करीत मोहिते यांनी आपल्या खात्यात पैसे कोणी काढले अशी विचारणा बँकेच्या अधिकाºयाकडे केली.
दरम्यान, बँकेच्या अधिकाºयांनी १४ ते १७ मार्च या चार दिवसात तुमच्या खात्यातून प्रत्येकी २० हजार असे ८० हजार रुपये काढल्याचे सांगितले. हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर मोहिते यांनी खात्यातील ५० हजार रुपये काढुन घेतले. बजाजनगरातील एसबीआय बँकेत अनोळखी भामट्याने एटीएम कार्डाची अदला-बदल करुन आपली ८० हजारांची फसवणूक केल्याचे लक्षात येताच मोहिते एमआयडीसी वाळूज पोलिस तक्रार दिली आहे.