वाळूज महानगर : वाळूज महानगरात बुधवारपासून (दि.२३) सुरू झालेल्या स्मार्ट सिटी शहर बससेवेमुळे येथील प्रवासी व कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या बससेवेमुळे खाजगी प्रवासी वाहतुकीला पायबंद बसणार आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रामुळे येथील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह शेकडो कामगार व नागरिकांची शहरात दररोज ये-जा सुरू असते. अपुऱ्या शहर बससेवेमुळे बसची पास असूनही बस मिळत नसल्याने या भागातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. पर्याय नसल्याने अनेकांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. याचा फायदा घेऊन खाजगी वाहनधारक वाहनात प्रवाशांची कोंबा कोंबी करून ने-आण करतात. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
आता नवीन स्मार्ट सिटी बससेवा सुरू झाल्यामुळे खाजगी प्रवासी वाहतुकीबरोबरच वाहनधारकांच्या दबंगगिरीला लगाम बसणार आहे. तसेच कमी पैशात प्रवास होत असल्याने प्रवाशांची होत असलेली आर्थिक लूटही थांबणार आहे. बुधवारी स्मार्ट सिटी बसचे महानगरात आगमन होताच या भागातील प्रवासी व कामगारांनी आनंद व्यक्त करून प्रवासही केला. या भागातील प्रवासी स्मार्ट सिटी बसने प्रवासाला प्राधान्य देत असल्याने गुरुवारी या सिटी बसेस प्रवाशांच्या गर्दीने भरून ये-जा करताना दिसल्या. एकूणच या बससेवेमुळे या भागातील विद्यार्थ्यांसह प्रवासी आनंदित झाले आहेत.