औरंगाबाद : स्वत:च्या ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला (३५) सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी मंगळवारी पोक्सो आणि भादंविच्या विविध कलमांखाली जन्मठेपेची शिक्षा आणि ५८ हजार रुपये दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी २० हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेशात म्हटले आहे.
याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली होती. पीडिता तिसरीच्या वर्गात शिकत होती. तिच्या बापाला दारू पिण्याची सवय आहे. ९ मार्च २०१७ रोजी आरोपीने पीडितेला नवीन चप्पल घेऊन देतो, असे सांगून सायकलवर देवगाव रंगारीला नेले; परंतु त्या रात्री आरोपी व पीडिता घरी आले नाही. दुसऱ्या दिवशी पीडितेला घरासमोर सोडून आरोपी बाहेरूनच निघून गेला. आई पीडितेला आंघोळीसाठी घेऊन गेली असता तिच्या पाठीवर मारहाणीचे व्रण दिसल्याने तिने विचारले असता पीडितीने सांगितले की, आरोपीने तिला देवगाव रंगारी येथे शेतात नेऊन अश्लील चाळे केले. पीडितेने विरोध केला असता आरोपीने तिला बेदम मारहाण केली. रात्री शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याबाबत देवगाव रंगारी ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक तथा सध्याच्या दौलताबाद ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता अरविंद बागूल आणि ज्ञानेश्वरी नागुला-डोली यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने नराधम पित्याला दोषी ठरवून भादंविच्या कलम ३७६ (२)(आय)(एफ) नुसार जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड, कलम ३२४ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंड, पोक्सोच्या कलम ४ नुसार जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड, पोक्सोच्या कलम ६ नुसार जन्मठेप आणि २० हजार दंड, पोक्सोच्या कलम ८ नुसार ५ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, पोक्सोच्या कलम १२ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड, पोक्सोच्या कलम ६ (१) नुसार २० हजार रुपये दंड ठोठावला.