औरंगाबाद : इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या विचाराने प्रेरित होऊन रासायनिक हल्ला अथवा धार्मिक कार्यक्रमाच्या अन्नात विष कालवून मोठी मनुष्यहानी करण्याची तयारी करीत असल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पकडलेल्या नऊ संशयितांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी (दि.१८) त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावून त्यांची रवानगी हर्सूल मध्यवर्ती कारागृहात केली.
मोहसीन सिराजउद्दीन खान (३२, रा. मुंब्रा, ह. मु. अहबाब कॉलनी, औरंगाबाद), मजहर अब्दुल रशीद शेख (२१, रा. अलमास कॉलनी, मुंब्रा), मोहम्मद तकी ऊर्फ अबू खालीद सिराजउद्दीन खान (२०, रा. मुंब्रा, ह. मु. राहत कॉलनी, औरंगाबाद), मोहम्मद मुशाहिद उल इस्लाम (२३, रा. कैसर कॉलनी), मोहम्मद सर्फ राज ऊर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी (२५, रा. राहत कॉलनी, औरंगाबाद), जमान नवाब खुटेपाड (३२, रा. अलमास कॉलनी, मुंब्रा), सलमान सिराजउद्दीन खान (२८, रा. अलमास कॉलनी), तलाह ऊर्फ अबू बकार हनिफ पोतरिक (२४, रा. एमरॉल्ड टॉवर, दोस्ती प्लॅनेट, उत्तर मुंब्रा, ठाणे) आणि फहाद सिराजउद्दीन खान (२८, रा. अलमास कॉलनी) अशी नावे संशयितांची आहेत. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २३ जानेवारी रोजी ९ संशयिताना आणि २६ जानेवारी रोजी आणखी एकाला औरंगाबाद आणि मुंब्रा येथून अटक केली होती. उम्मत-ए- मोहम्मदिया या ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या संशयितांची एटीएसने तब्बल २७ दिवस कसून चौकशी केली.
आरोपी हे आयएसआयएस (इसिस) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या विचाराने प्रभावित होऊन मुख्य संशयित मोहसीन खान याने उम्मत-ए- मोहम्मदिया या नावाने एक ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये त्याने औरंगाबाद, ठाणे आणि मुंबईत निवडक लोकांच्या (कोअर कमिटी) बैठका घेऊन मोठी जीवित हानी करण्याचा कट रचल्याची माहिती तपासात समोर आल्याचे एटीएसने न्यायालयास दिली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कडक बंदोबस्तात न्यायालयासमोर हजर केले. उभयपक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व संशयिताना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावून त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात केली.