औरंगाबाद : इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या विचाराने प्रभावित होऊन देशात घातपाती कृत्य करण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून एटीएसने अटक केलेल्या मुंब्रा आणि औरंगाबादेतील आरोपींच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून खुलताबादेतील एका डॉक्टरची दहशतवादविरोधी पथकाकडून चौकशी सुरू असल्याचे समोर आले. २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान ही चौकशी झाली. शिवाय त्या डॉक्टरला पोलिसांच्या परवानगीशिवाय कोठेही जाण्यास मनाई करण्यात आली.
वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या विचाराने प्रभावित होऊन उम्मत-ए- मोहम्मदिया या ग्रुपच्या माध्यमातून देशात घातपाती कृत्य करण्याची तयारी असल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने संशयित मोहसीन सिराजउद्दीन खान (३२, रा. मुंब्रा, ह. मु. अहबाब कॉलनी, औरंगाबाद), मजहर अब्दुल रशीद शेख (२१, रा. अलमास कॉलनी, मुंब्रा), मोहम्मद तकी ऊर्फ अबू खालीद सिराजउद्दीन खान (२०, रा. मुंब्रा, ह. मु. राहत कॉलनी, औरंगाबाद), मोहम्मद मुशाहिद उल इस्लाम (२३, रा. कैसर कॉलनी), मोहम्मद सर्फ राज ऊर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी (२५, रा. राहत कॉलनी, औरंगाबाद), जमान नवाब खुटेपाड (३२, रा. अलमास कॉलनी, मुंब्रा), सलमान सिराजउद्दीन खान (२८, रा. अलमास कॉलनी), तलाह ऊर्फ अबू बकार हनिफ पोतरिक (२४, रा. एमरॉल्ड टॉवर, दोस्ती प्लॅनेट, उत्तर मुंब्रा, ठाणे) आणि फहाद सिराजउद्दीन खान (२८, रा. अलमास कॉलनी) यांना जानेवारी महिन्यात औरंगाबाद आणि मुंब्रा येथून अटक केली होती.
हे सर्व संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात आहेत. या संशयित आरोपींच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून एटीएसने खुलताबादेतील डॉक्टरची २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान कसून चौकशी केली. या चौकशीनंतर त्यास सोडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, त्याला एटीएसच्या परवानगीशिवाय गाव सोडून जाण्यास मनाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरला पैसे पाठविल्याचा संशयएटीएसने अटक केलेल्या संशयितामार्फत जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांना पैसा पुरविण्यात आला होता, असा खळबळजनक खुलासा एटीएसच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी विशेष न्यायालयासमोर केला.