औरंगाबाद : दहावी बोर्ड परीक्षेत शेजारी बसलेल्या विद्यार्थ्याने पेपर सोडविण्यासाठी त्याचा पेपर न दाखविल्याचा राग मनात धरून चार मित्रांच्या मदतीने चाकूहल्ला केल्याची घटना पडेगाव रस्त्यावर घडली. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
ऋषिकेश श्रावण सोळुंके (१६, रा. पडेगाव) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. छावणी पोलिसांनी सांगितले की, ऋषिकेश हा दहावीचा विद्यार्थी आहे. पडेगाव येथील रेजिमेंटल इंग्लिश स्कूल हे त्याचे दहावी बोर्ड परीक्षेचे सेंटर होते. २१ मार्च रोजी तो त्याचा पेपर देत असताना त्याच्या शेजारी दुसरा विद्यार्थी परीक्षा देत होता. त्यावेळी तुझी उत्तरपत्रिका दाखव असा तो ऋषिकेशला म्हणाला. ऋषिकेशने त्यास उत्तरपत्रिका दाखविण्यास नकार दिल्याचा राग त्याला आला आणि त्याने तुला पाहून घेईन, अशी धमकी दिली होती.
दुसऱ्या दिवशी २२ मार्च रोजी दुपारी दहावीचा शेवटचा पेपर संपल्यानंतर ऋषिकेश घरी जात होता. त्यावेळी त्या विद्यार्थ्याने त्याचे आणखी पाच ते सहा विद्यार्थी बोलावून घेतले होते. त्या सर्वांनी ऋषिकेशचा रस्ता अडवून लाथाबुक्क्यांनी आणि नंतर एकाने थेट पोटावर चाकूसारख्या शस्त्राने वार क रून जखमी केले. या घटनेनंतर ऋषिकेशला जखमी अवस्थेत सोडून त्याला मारहाण करणारे पळून गेले. तर अन्य लोकांनी ऋषिकेशला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलीस उपनिरीक्षक जी. एस. सुरवसे तपास करीत आहेत.