लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेतील अतिक्रमण हटाव विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. येथे काम करणारे अधिकारी व कर्मचारी दलालांमार्फत सर्व कामे करतात. त्यामुळे शहरात महापालिकेचा अजिबात धाक राहिलेला नाही. चक्क महापालिकेच्या मालमत्तांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात येत असल्याचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला निदर्शनास आणून दिले. महापालिका आयुक्तांनीही नगरसेवकांच्या सुरात सूर मिसळत या विभागावर तीव्र नाराजी दर्शवीत लवकरच कालबद्ध कार्यक्रम राबवून अतिक्रमणे काढण्याचे आश्वासन दिले.मंगळवारी सकाळी सर्वसाधारण सभा सुरू होताच अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख सी.एम. अभंग, कंत्राटी कर्मचारी दुबे यांच्या लाचखोरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अतिक्रमणे काढण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, तोच विभाग भ्रष्टाचाराला खतपाणी घालत अतिक्रमणांना संरक्षण देत आहे. शहराला आलेल्या बकालपणालाही हाच विभाग शंभर टक्के जबाबदार आहे, असा आरोप राजेंद्र जंजाळ यांनी केला. मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरात दलाल सोडले आहेत. तक्रारीही करणारे, समेट घडवून आणणारे यांनीच नेमले आहेत. परवानगी घेऊन बांधकाम करणा-यांविरुद्ध तक्रारही हीच मंडळी द्यायला लावते. नगररचना विभागाकडून स्थगिती मिळवून त्याला ब्लॅकमेल करणारेही आपलेच अधिकारी आहेत, असे राजू शिंदे यांनी नमूद केले. माहिती अधिकारात वारंवार अर्ज करणारे कोण? अतिक्रमण विभागात तक्रारी करणारे कोण? नंतर माझी तक्रार नाही, असे लिहून देणारे कोण? याचा गांभीर्याने शोध घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. कंत्राटी कर्मचा-याच्या एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी त्र्यंबक तुपे यांनी केली. अफसर खान, शिल्पाराणी वाडकर, राज वानखेडे, शेख अजीम, सुरेखा सानप, स्वाती नागरे, ज्योती पिंजरकर, मनीषा मुंढे आदींनी तक्रारींचा पाढाच वाचला.
अतिक्रमण विभागावर आगपाखड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:50 AM