औरंगाबाद : सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या तक्रारीवरून खासदार इम्तियाज जलील यांच्यासह २४ दुकानदारांविरुद्ध मंगळवारी रात्री उशिरा क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कामगार उपायुक्त शैलेश यशवंत पोळ यांनी यासंबंधीची तक्रार दाखल केली आहे.
लॉकडाऊनचे उल्लंघन करून दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांची ५६ दुकाने गत महिन्यात सील करण्यात आली होती. या दुकानांचे सील काढावे, याकरिता खा. जलील हे शहरातील २४ दुकानदारांना घेऊन मंगळवारी (दि. १) दुपारी १२:२० वाजता कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांनी, ‘दुकानाचे सील काढ, तू कामगारांसाठी येथे बसलेला आहे, व्यापाऱ्यांना दुकान उघडण्याची परवानगी दे, त्यांना काय दंड लावणार ते आताच सांग’, असे उद्धटपणे बोलून पोळ यांच्यावर दबाव टाकला. ‘तू कलेक्टरची हुजरेगिरी करतोस’, असे अपमानास्पद उद्गार काढले. मागण्या पूर्ण होईपर्यंत येथून उठणार नाही आणि दुकानाचे सील काढत नाही तोपर्यंत तुलाही उठू देणार नाही, अशी दमबाजी करीत जलील यांनी त्यांना डांबून ठेवले.
उपायुक्त पोळ यांनी मंगळवारी रात्री उशिरा क्रांती चौक ठाण्यात खा. जलीलविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी जलील यांच्यासह दुकानदार नासेर सिद्दीकी, शेख सलीम शेख शरीफ (एफ.एस. टेलिकॉम मोबाईल शॉप, सब्जी मंडी), राजेश मेहता, ललितकुमार जैन, (गजानन गिफ्ट ॲण्ड टॉईज, जालना रोड), अनुप तोलवानी (रुख्मिणी साडी, रंगारगल्ली), मोहम्मद शफिक, (गुलशन क्लॉथ, सिटी चौक), मोहम्मद फारुक (लुकिंग बॉईज कापड दुकान, पैठण गेट) चरणसिंग (पंजाब शूटींग शर्टिंग, सिटी चौक), जहिनी एम. रज्जाक (ऑनेस्टी शॉप, सिटी चौक), नंदू जाधव (सेव्हन लाईंट्स ॲण्ड इलेक्ट्रिकल्स, सेव्हन हिल, जालना रोड), सुनील किंगर (गुरुनानक ट्रेडिंग अंगुरीबाग), मोहम्मद पाशा (स्टार फॅशन, रंगारगल्ली), रोहित सावजी (अभय ड्रेसेस, मछलीखडक), मोहम्मद अब्रार (मीना टेक्स, रंगारगल्ली), फईम शेख (सबा कलेक्शन, रंगारगल्ली), कौशिक तोलानी (मनोकामना क्लॉथ, रंगारगल्ली), रहिमखान (झोया कलेक्शन, रंगारगल्ली), शौकत अली (करिश्मा क्लॉथ, रंगारगल्ली), संजय रतन दोसी (रतनलाल मोतीलाल कापड दुकान, मछलीखडक), वसीम शेख (एम.झेड. कलेक्शन, रंगारगल्ली), मुबीन खान अजमत खान (आर.के. कलेक्शन, कुंभारवाडा), अभिषेक चांडक (चांडक ब्रदर्स, कुंभारवाडा), अनिस कुरेशी (प्लस पॉईंट कापड दुकान, रंगारगल्ली), पृथ्वीराज व्यंकटेश कावेटी (अण्णा फॅन्सी फॅशन, रंगारगल्ली) या २४ व्यापाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.
महिला पोलिसाला धक्का देऊन पाडला मोबाईलखा. जलील यांच्या कृत्याची शूटिंग महिला पोलीस कॉन्स्टेबल एन. टी. खान या त्यांच्या मोबाइलवर करीत होत्या. ही बाब जलील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी खान यांच्या हातावर हात मारून मोबाईल खाली पाडला. त्यांना बोट दाखवून रागाने, ‘मॅडम येथे एन्टरटेन्मेंटसाठी आलो नाही. जमत नसेल तर बाहेर उभे राहा’, असे म्हणून त्यांच्याही सरकारी कामात अडथळा आणला.
या ९ कलमान्वये गुन्हा नोंदविला- कलम १४३ , १४७ ,१४९ (गैरकायद्याची मंडळी जमविणे), कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा आणणे),- कलम ३३२ (लोकसेवकाला दुखापत करणे),- कलम १८८ (लोकसेवकांच्या आदेशाची अवहेलना करणे),- आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २६९ आणि २७० (साथरोग प्रसार होऊ शकतो हे माहीत असूनही तशी वर्तणूक करणे), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ (जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे).