औरंगाबाद : आठवडाभरापासून विस्कळीत झालेल्या शहरातील पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर काही तरुणांनी शनिवारी दुपारी सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे मुख्य कार्यालय फोडले. तोंडाला रुमाल बांधून आणि हातात दंडुके घेऊन आलेल्या तरुणांनी कंपनीविरुद्ध चले जावच्या घोषणा देत दरवाजे, खिडक्यांच्या काचा फोडल्या. तसेच कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यामध्ये कंपनीचे सुरक्षा सल्लागार जखमी झाले. तब्बल अर्धा तास कार्यालयात ही तोडफोड सुरू होती. शहरात गेल्या आठवडाभरापासून पाणीपुरवठ्याची बोंब आहे. त्यामुळे कंपनीविषयी नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे. शुक्रवारीच नगरसेवकांनी दोन अधिकाऱ्यांना मारहाण केली. तसेच विश्रांतीनगरातील महिलांनी सिडकोतील जलकुंभावर जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घातला. त्यातच आज दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास पाच ते सहा तरुण कंपनीच्या सिडको एन-१ मधील मुख्य कार्यालयात धडकले. हातात दंडुके घेऊन आणि तोंडाला रुमाल बांधून आलेल्या या तरुणांनी आरडाओरडा करीत आणि घोषणाबाजी करीत तोडफोडीला सुरुवात केली. त्यांनी प्रवेशद्वाराच्या आणि खिडक्यांच्या काचा फोडल्या. तसेच कार्यालयातील टेबल- खुर्च्या उचलून फेकून दिल्या.
‘समांतर’च्या कार्यालयावर हल्ला
By admin | Published: December 28, 2014 1:10 AM