औरंगाबाद : दारूच्या नशेत एक जणाला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्यास समजावून सांगण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच त्याने शिवीगाळ करून मारहाण केली. एवढेच नव्हे तर ठाण्यासमोरच चक्क लाथा मारून पोलिसांच्या जीपची काच फोडली. ही घटना जयभवानीनगर चौक आणि पुंडलिकनगर पोलीस ठाण्यासमोर गुरुवारी रात्री घडली. सतीश हजारी (रा. लक्ष्मी कॉलनी, सिडको) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, पुंडलिकनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, कर्मचारी राहुल चावरिया, गोलवाल हे २१ जुलै रोजी रात्री जयभवानीनगर चौकात नाकाबंदी करीत होते. या चौकातील एका हॉटेलबाहेर अन्नपदार्थ पुरवठा करणारा आरोपी हा एक जणाला मारहाण करीत होता. यावेळी पोलीस कर्मचारी भांडण सोडविण्यासाठी धावले असता आरोपीने पोलिसांनाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तो दारू पिलेला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन तुझी वैद्यकीय तपासणी करायची असल्याचे सांगितले. तेव्हा त्याने पोलीस कॉन्स्टेबल राहुल चावरिया यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. पोलिसांनी बळाचा वापर करून त्यास जीपमध्ये बसून पोलीस ठाण्यासमोर आणले. त्यावेळी आणखी आरडाओरड करीत पोलीस जीपला लाथ मारली. या घटनेत जीपच्या मागील काचेचे तुकडे तुकडे झाले. यापैकी एक काच उडून पोलीस कॉन्स्टेबल गोलवाल यांच्या डोळ्याला लागल्याने त्यांना दुखापत झाली.त्यानंतरही पोलिसांनी त्यास घाटीत नेऊन त्याची तपासणी केली. त्याच्या विरोधात पुंडलिकनगर ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसास मारहाण करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. शुक्रवारी न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी मंजूर केल्याचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे यांनी सांगितले.
मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला
By admin | Published: July 24, 2016 12:23 AM