औरंगाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेक अपप्रवृत्ती शिरल्या आहेत. या अपप्रवृत्तींवर उदाहरणांसह प्रहार केला आहे. त्यात कोणत्याही राजकीय नेत्यांवर टीका करण्यात आलेली नाही. ज्यांना मराठी भाषा समजते, त्यांना महामंडळ आणि माझी भूमिका काय आहे हे 'अक्षरयात्रा'चे अध्यक्षीय वाचल्यास समजेल, अशा शब्दांत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. तसेच अध्यक्षीय मनोगतामधील प्रत्येक शब्दावर आपण ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी महामंडळाच्या वार्षिक 'अक्षययात्रा'च्या अध्यक्षीयमध्ये मराठी साहित्य संमेलनात घुसलेल्या अपप्रवृत्तींवर परखड टीका केली. त्यामुळे साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ‘लोकमत’मध्ये याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ठाले पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केली. महामंडळाच्या वार्षिकात कोणावरही टीका केलेली नाही. साहित्य महामंडळाचा उपयोग कोणी स्वत:साठी करू नये, साहित्य संमेलनात घुसलेल्या अनिष्ट वृत्तीमुळे संमेलन धंदा म्हणून वापरले जाऊ नये, यासाठी महामंडळाने जाहीर भूमिका घेतली आहे. मागील वर्षी ब्राह्मण साहित्य संमेलनावर अधिकृतपणे भूमिका घेतली होती. यावर्षी नाशिक येथे होणाऱ्या नियोजित साहित्य संमेलनादरम्यान घडलेल्या घटना उदाहरणासह उजेडात आणल्या आहेत. यातून साहित्य संमेलनात सुधारणा व्हावी, हीच अपेक्षा आहे. साहित्य संमेलन हे लोकांचे झाले पाहिजे. त्यासाठी राजकीय व्यक्ती, सरकारचाच पैसा असू नये. साहित्यप्रेमींचा पैसा नसेल तर संमेलन निव्वळ राजकीय नेत्यांचे किंवा सरकारचेच होईल. साहित्य महामंडळाला हेच नको आहे. मागील वर्षी उस्मानाबाद येथे झालेले साहित्य संमेलन कोणत्याही राजकीय मदतीशिवाय आणि अवघ्या तीन जणांनी मेहनत घेत कमी पैशांत यशस्वी करून दाखविले आहे. त्याच पद्धतीचे संमेलन नाशिक येथे घेतले जावे, हीच अपेक्षा निमंत्रक संस्थेकडे संमेलन देताना व्यक्त केली होती. ती त्यांनाही मान्य होती; मात्र संमेलनाचा स्वागताध्यक्ष निवडण्याचा असलेल्या अधिकाराचा वापर करून निधी संकलनाचे काम स्वागताध्यक्षावर सोपविल्याचेही ठाले पाटील यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला महामंडळाचे कार्यवाह डॉ.दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांची उपस्थिती होती.
चौकट,
चर्चेतून दिशा मिळावी
मराठी साहित्य संमेलनात घुसलेल्या अपप्रवृत्तीवर मी लिहिले आहे. भूमिका घेतली आहे. ती अनेकांना आवडेल, अनेकांना आवडणार नाही. दोन्ही बाजूची मते मला मान्य आहेत. त्यावर चर्चा व्हावी. या चर्चेतून दिशा मिळावी. साहित्य संमेलन हे निव्वळ साहित्यासाठी व्हावे, हीच अपेक्षा असल्याचेही ठाले पाटील यांनी स्पष्ट केले. महामंडळाचा कार्यकाळ आणखी एक वर्ष असणार आहे. तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहून योग्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्याकडून महामंडळ गेल्यानंतर बोलून, भूमिका घेऊन उपयोग होणार नाही. ती आताच घेतली पाहिजे. त्यानुसार ती घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.