परतूर : वाटूर फाटा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शटर तोडून बँक फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. यावेळी बँकेतील सीसीटीव्ही मात्र चोरटे घेूवन पसार झाले. या गुन्ह्याच्या तपासासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. वाटूर फाटा येथे रविवारी पहाटे ३ च्या सुमारास चोरट्यांनी मंठा रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शटर तोडून आत प्रवेश केला. बँकेतील कपाट फोडून कागदपत्र अस्ताव्यस्त केले. तसेच लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाल्याने बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे व डी. व्ही. डी. घेवून चोरटे पसार झाले. या प्रकरणी शाखाधिकारी अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेच्या तपसासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. मात्र, श्वान जागेवरच घुटमळत राहिल्याने चोरट्याचा माग काढण्यात पोलिसांना यश आले नाही. वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी वाटूरमधील ग्रामस्थांतून केली जात आहे. (वार्ताहर)
वाटूर येथील बँक फोडण्याचा प्रयत्न
By admin | Published: January 30, 2017 12:01 AM