औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे बलात्कारित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांना तेथील पोलिसांनी अपमानित वागणूक देऊन अटक केली. त्याच्या निषेधार्थ गुरूवारी औरंगाबादेत संतप्त प्रतिक्रिया उमटली. सायंकाळी क्रांती चौक परिसरात काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र जमले आणि त्यांनी जोरदार नारेबाजी करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला.
भाजपा हटाव...बेटी बचाव, योगी सरकार ...हाय हाय, राहुल गांधी जिंदाबाद, योगी सरकार बरखास्त करा आदी घोषणांनी क्रांती चौक परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. यावेळी त्यांच्या हातात निषेधाचे फलक होते. योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेतले.
या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अनिल पटेल, शहर काँग्रेसचे अध्यक्ष हिशाम उस्मानी, माजी शहराध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुझफ्फर खान पठाण, युवक काँग्रेसचे प्रवक्ते निलेश आंबेवाडीकर, एन एस यु आयचे मोहित जाधव, अपंग सेलचे शहराध्यक्ष मुदस्सर अन्सारी, एससी विभागाचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश नारनवरे, शहराध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट, इंटकचे शहराध्यक्ष ॲड. इक्बालसिंग गिल, संतोष भिंगारे, अनिल मालोदे, शरद जाधव, अनुर शिंदे, मोहसीन खान, आमेर रफिक खान, सय्यद फय्याजोद्दीन, निमेश पटेल यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.