खुलताबाद : नगर परिषदेच्या दोन कोटी रुपयांच्या विकास कामांवरून काही जण राजकारण करीत आहेत. विकासकामात अडथळा निर्माण करून लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष सुरेश मरकड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला आहे.
उपनगराध्यक्ष सुरेश मरकड म्हणाले की, खुलताबाद नगर परिषदेने नुकतेच दोन कोटी रुपयांची विकासकामे हाती घेतली आहेत. निविदा प्रसिद्ध झाली होती; परंतु काही नगरसेवक व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यात जुनी कामे नव्याने टाकल्याचे (आरोप) म्हटले आहे. वास्तविक भद्रा कॉलनीतील २०१७ मध्ये झालेल्या डांबरीकरण कामात ‘एक लेर’ टाकण्याचे नवीन कामात नियोजन आहे. २०१७ ला या कामात जास्तीचा निधी नसल्याने हे काम अपूर्ण राहिले होते. यासंबंधी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. डिसेंबरमध्ये खुलताबाद नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय तथाकथीत पुढारी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष नगरसेवक व प्रशासनास बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मरकड यावेळी म्हणाले. यावेळी पाणी पुरवठा सभापती योगेश पा. बारगळ, गजानन पा. फुलारे उपस्थित होते.