औरंगाबाद : बनावट कागदपत्राच्या आधारे गणेशनगर येथील दोन भूखंड हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
जयनारायण बाबूराव शिंदे, छबाबाई सर्जेराव सावंत, सर्जेराव रामभाऊ सावंत, सदाशिव गणपत म्हात्रे, संतोष सदाशिव भोसले आणि अशोक सोनाजी लहाने अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदिराज म्हणाले की, तक्र ारदार दीपक विश्वनाथ नेहते (४५, रा. देवानगरी) यांनी २९ जून २००० रोजी गणेशनगर येथील प्लॉट नंबर ९ आणि १० (ज्याचे प्रत्येकी क्षेत्रफळ सहाशे चौ. फूट) सांडू किसनराव पाटील यांच्याकडून खरेदी केले होते, असे असताना आरोपींनी दोन्ही भूखंडांचे बनावट खरेदीखत-करारनामा तयार केला.
या कागदपत्राच्या आधारे त्यांनी हे दोन्ही भूखंड बळकावण्याचा प्रयत्न केला. याविषयी तक्रारदार यांना माहिती मिळताच त्यांनी आरोपींकडील कागदपत्राची पडताळणी केली असता त्यांच्याकडे बनावट कागदपत्रे असल्याचे त्यांना समजले. यानंतर त्यांनी आज बुधवारी तक्रार नोंदविली.