लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणलोट क्षेत्र विकास कामात गुत्तेदाराची बिलाची १५ लाख, ७२ हजार रु पये एवढी रक्कम बनावट दस्तावेज व बनावट सह्या करून परस्पर उचलून संबंधित गुत्तेदाराला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात माजलगाव प्रथम वर्ग न्यायालयाने तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत रमाकांत देशमाने, पर्यवेक्षक कल्याण सदाशिव अंबुरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी एस.एस.खरोसे यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिले आहेत.न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एम.ए.२०४/१७ नुसार फिर्यादी वसंत घन:श्याम चोपडे यांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की, तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात येणाºया पाणलोट क्षेत्रातील बांधबंदिस्ती करणे, डब्बरी पिचिंग, नाला बांधकाम करणे, इत्यादी संबंधित कामे करण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या टॅÑक्टर व इतर साधनसाम्रगीच्या माध्यमातून ते गेली वीस वर्षे वरील कामे केली आहेत. अशीच कामे चोपडे यांनी माजलगाव तालुक्यातील सावरगाव,जदिदजवळा, हरकीलिमगाव, शहापूर मजरा, मनूर, आदी गावात केली होती; पण यातील कामाच्या देय रकमेतील उपरोक्त नमूद रक्कम थकीत राहिली होती व यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले होते; पण ती रक्कम मिळत नव्हतीच.शेवटी चंद्रकांत देशमाने व कल्याण अंबुरे यांनी चोपडेंशी हिशोब करण्यासाठी २८/१०/२०१६ रोजी चोपडेंच्या मालीपारगाव येथील शेतात ओली पार्टी ठेवून चोपडेंना दारूतून विषारी द्रव टाकले. याचा अहवाल माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी ३/११/२०१६ रोजी दिला होता. यावर चोपडेंनी बीड जिल्हा पोलीस प्रमुखापर्यंत तक्र ार केली होती; पण त्याची दखल घेतली नाही. म्हणून विधिज्ञ शेख अतिख यांच्या माध्यमातून वरीलप्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली होती. याचा निकाल २१/९/२०१७ रोजी देऊन देशमाने व अंबुरे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी दोघांविरोधातही माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक संजय पवार हे करीत आहेत.
बनावट दस्तऐवजातून १५ लाख ७२ हजार हडप करून जिवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 11:44 PM