औरंगाबाद : दोन रूमच्या घरासह भूखंडाचा ताबा घेण्यासाठी आलेल्या महिलेसह दोन जणांनी एका तरुणासोबत झटापट करून त्यास विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी दुपारी चिकलठाण्यातील सावित्रीनगरात घडली. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात एका महिलेसह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
राज बरंडवाल आणि एका महिलेचा आरोपीमध्ये समावेश आहे. पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार तक्रारदार भारत देवराव घोरपडे (३६, रा. चिकलठाणा परिसर) यांचा आरोपी महिलेसोबत भूखंड विक्रीचा व्यवहार झाला होता. ११ ऑगस्ट रोजी भारत हे त्यांच्या सावित्रीनगर येथील भूखंडावर असताना आरोपी महिला आणि राज बरंडवाल तेथे आले. त्यांनी तक्रारदार यांच्याकडे भूखंडाचा ताबा द्या अथवा त्यांचे पैसे त्यांना परत करा, अशी मागणी केली. सध्या पैसे नाही, तुम्हाला नंतर पैसे देतो, असे तक्रारदार हे त्यांना सांगत असताना आरोपींनी त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्यांच्यासोबत झटापट केली आणि महिलेने तिच्या पर्समधून एक बाटली काढली. या बाटलीतील औषध बळजबरीने त्यांनी भारत यांना पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरड केल्याने लोक जमा झाले. यानंतर आरोपी तेथून पळून गेले. भारत यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दोन दिवस उपचार घेतल्यानंतर याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पेालिसांनी गुन्हा नोंदविला असून, उपनिरीक्षक संजय मांटे तपास करीत आहेत.