औरंगाबाद: भाजपने पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केला आहे, त्यांना सातत्याने डावलले जात आहे, अशा घोषणा देत तिघांनी शहर भाजपच्या कार्यालयात हल्ल्याचा आज दुपारी हल्ल्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. यानंतर भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी हे विरोधकांचे काम आहे, हल्लेखोर भाजपचे किंवा पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते नव्हते अशी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील राज्यसभा आणि विधानपरिषद दोन्ही निवडणुकीत भाजपच्या सरचिटणीस पंकजा मुंडे यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. माझे काही मागणे नाही, पण संधी मिळाली तर सोने करून, असे जाहीर वक्तव्य काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी केले होते. विधानसभेत परळी येथून पराभव झाल्यापासून राज्यातील राजकारणातून त्यांना बाजूला करण्यात येत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. यामुळेच यावेळी देखील विधानपरिषदेला पंकजा मुंडे यांना तिकीट नाकारण्यात आल्याने मुंडे समर्थकांमध्ये भाजप नेतृवाविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. यातूनच आज दुपारी शहर भाजपच्या कार्यालयावर तीन मुंडे समर्थकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पंकजा मुंडे तुम आगे बढो, पंकजा यांच्यावर अन्याय होतोय अशी घोषणाबाजी करत तिघांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, हल्ला करणाऱ्या एकाचे नाव सचिन डोईफोडे असे असून तो जय भगवान महासंघाशी संबंधित आहे.
ते भाजपचे कार्यकर्ते नाहीत, हे विरोधकाचे काम हल्ला करणारे भाजपचे कार्यकर्ते नव्हते, ते पंकजा मुंडे यांचेही समर्थक नाहीत अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिली. तसेच हे कृत्य विरोधकांनी केले असल्याचा आरोपही केणेकर यांनी केला. आम्ही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत असल्याने सातत्याने खुनाच्या धमक्या येत आहेत, असेही केणेकर म्हणाले.