औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालयात दाखल एका महिलेवर निवासी डॉक्टर विद्यार्थिनीने सुरुवातीला उपचार केले. त्या महिलेचे निधन झाल्यानंतर तिचा पती ९ फेब्रुवारीपासून दररोज हॉस्पिटलमध्ये येत उपचार करणाऱ्या डॉक्टरसोबत लगट करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने मंगळवारी रात्री नऊ वाजता डॉक्टरची दुचाकी अडवून व्हॉटस्ॲप नंबर मागून लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.
कन्हैय्या वसंतराव टाक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कन्हैय्या याची पत्नी राधा यांना ३ फेब्रुवारीला कर्करोग रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. याच कालावधीत त्याने रुग्णालयातील महिलांच्या वॉश रूममध्ये जाऊन धिंगाणा घातला. ८ फेब्रुवारीला राधाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे नातेवाईक घरी घेऊन गेले. ९ फेब्रुवारीला रात्री दहा वाजता कन्हैय्या जनरल वाॅर्डात येऊन पत्नीवर उपचार करणाऱ्या डॉक्टराला धन्यवाद म्हणून ‘आय लाईक यू’ असे शब्द उच्चारून निघून गेला. त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने तो रुग्णालयात दररोज येऊन पाठलाग करीत होता. २० फेब्रुवारीला त्याने रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात उपस्थित डॉक्टरांना पत्नीच्या तेरावीची पत्रिकाही दिली. ही माहिती रुग्णालयाचे ओएसडी डॉ. अरविंद गायकवाड यांना संबंधित विद्यार्थिनीने दिली. यानंतर २२ फेब्रुवारीला पीडित डॉक्टर मैत्रिणीसोबत रात्री नऊ वाजता दुचाकीवरून घरी जात असताना त्याने समोर येऊन गाडी थांबविली. तसेच स्वत:जवळील चावी देऊन स्वत:ची गाडी वापरण्यास ठेवा, असे सांगू लागला. त्याच वेळी व्हाॅटस्ॲप नंबरही मागितला. तिने नकार दिल्यानंतर त्याने जवळ येऊन आवाज चढवून स्कूटी बंद करण्याची ताकीद दिली. या प्रकारामुळे विद्यार्थिनीने बुधवारी ठाण्यात तक्रार दिली. यावरून सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
खासगी सुरक्षारक्षकांचे आरोपीलाच सहकार्यकन्हय्याने पत्नीवर उपचार सुरू असताना महिलांच्या वॉशरूममध्ये धिंगाणा घातला होता. त्याची माहिती रुग्णालयाची सुरक्षा पाहणाऱ्या मेस्को कंपनीचे इन्चार्ज के. टी. गायकवाड यांना दिली होती. त्यांनी दुर्लक्ष केले. पत्नीचे निधन झाल्यानंतर तो दररोज येत असल्यामुळे त्यास हॉस्पिटलमध्ये येऊ देऊ नका, असे गायकवाड यांना पीडितेने सांगितले. त्यावर त्यांनी ‘तुम्हाला या गोष्टीतूनही शिकवण मिळेल, ज्या गोष्टी पुस्तकामध्ये नसतात’ असा शहाणपणाचा सल्ला दिला. यानंतर २२ फेब्रुवारी रात्री ९ वाजता कन्हया सुरक्षारक्षकासोबत खुर्ची टाकून बाहेर बसला होता. दोन विद्यार्थिनीची छेड काढली जात असताना त्यांना सुरक्षारक्षकांनी कोणतीही मदत केली नसल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.
दामिनी पथकाला कळवलेमंगळवारी रात्री या घटनेनंतर आरोपी कन्हय्या बुधवारी सकाळी रुग्णालयात आला. त्याला पाहिल्यानंतर एका डॉक्टरांनी शहर पोलिसांच्या दामिनी पथकाला कळविले. दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक सुवर्णा उमाप पथकासह रुग्णालयात दाखल झाल्या. त्याच वेळी सिटी चौक पोलीसही आले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.