औरंगाबाद: चिकलठाणा एमआयडीसीमधील अंदाजे पाच कोटी रुपये किंमतीचे शेडचे बनावट कागदपत्रे तयार करून ते हडपण्याचा प्रयत्न करणा-या एका जणाविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुरूवारी गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हेशाखा करीत आहे.
गोविंद शिवाजीराव गिते (रा. परळी वैजिनाथ, जि.बीड) असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, भाग्यनगर येथील रहिवासी नितीन देशपांडे यांच्या मालकीचे चिकलठाणा एमआयडीसीमध्ये भूखंड आहे.या भूखंडावर त्यांनी शेड बांधलेले आहे. काही वर्षापूर्वी त्यांनी त्यांचे शेड आरोपी गोविंदला भाडेतत्वावर दिले होते. यामुळे तक्रारदार आणि आरोपी यांच्यात ओळख झाली. आरोपीने तक्रारदार यांच्याकडून शेडच्या मालकी हक्काबाबतची सर्व कागदपत्रांची माहिती मिळविली.
यानंतर त्याने सदर शेड नितीन देशपांडे यांच्याकडून खरेदी केल्याचे बनावट कागदपत्र तयार केले. तेव्हापासून तो तक्रारदार यांना शेडचे भाडेही त्यांना देत नव्हता. यामुळे तक्रारदार यांनी त्याच्याकडे भाडे दे अन्यथा शेड खाली कर असे सांगितले. तेव्हा त्याने ही जागा आता तुमची नसून तोच जागेचा मालक असल्याचे त्यांना म्हणाला. तुम्हीच ही जागा मला विक्री केली,असेही त्याने सांगितले. भाडेकरू म्हणून ठेवलेल्या गितेने विश्वासघात करून पाच कोटी रुपये किंमतीचे शेड हाडपण्याचा डाव रचल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आला. यामुळे त्यांनी थेट पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. हा अर्ज आयुक्तांनी चौकशीसाठी आर्थिक गुन्हेशाखेकडे सोपविला. अर्जाच्या चौकशीअंती पोलिसांनी गिते यास बोलावून त्याच्याकडील कागदपत्राची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी नितीन देशपांडे यांची फिर्याद घेत एमआयडीसी सिडको ठाण्यात गुरूवारी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.