वाळूज महानगर : बांधकाम मजूर असलेल्या आजी, वडील आणि मामांसोबत शेडमध्ये झोपलेल्या एका 7 वर्षीय चिमकलीचे अपहरण करून तिच्यावर दोघांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री वडगाव कोल्हाटी येथे घडली. दरम्यान, चिमुकलीवर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरु आहेत. तर दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या विषयी अधिक माहिती अशी की, वडगाव (को.) साजापूर रस्त्यावर एका तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर काम करणारे मजूर तेथेच बाजूच्या पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. गुरुवारी रात्री पीडित चिमुकली आजी, वडील व दोन मामांसोबत शेडमध्ये झोपली होती. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास दोन अज्ञान आरोपींनी चिमुकलीचे अपहरण केले. घरापासून तिला 100 मीटर अंतरावर नेऊन आरोपींनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या चिमुकलीने आरडाओरडा केला. यामुळे आरोपी तिला येथेच टाकून पळून गेले. यानंतर घाबरलेली चिमुकली घराच्याविरुद्ध दिशेने पळत जात एका ठिकाणी लपून बसली. दरम्यान, आरडाओरडा ऐकून शेजारील नागरिक तेथे जमा झाले. त्यांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, वाळूज एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
चिमुकलीवर उपचार सुरुपीडित चिमुकलीवर आरोपींनी अत्याचाराचा प्रयत्न केला. या दरम्यान त्यांनी तिच्या ओठाचा चावा घेतला आहे. सध्या चिमुकलीस उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरु आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास करत आहेत. चिमुकलीचे अपहरण करण्यापूर्वी आरोपींनी इमारतीवर झोपलेल्या एका मिस्त्रीचा मोबाईल चोरला असल्याची माहिती पुढे आली आहे.