औरंगाबाद : पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात ( Commissioner Of Police Aurangabad) थेट घुसखोरी करून तेथील कर्मचाऱ्यांशी अरेरावी करीत गोपनीय शाखेतील कागदपत्रांचे व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. हा प्रकार बुधवारी दुपारी ३ वाजता घडला. पोलिसांनी त्याला अटक करीत बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ( Attempted shooting of confidential branch documents at the Commissioner of Police Aurangabad ; One in custody)
सय्यद निहाल अहेमद सय्यद शकील अहेमद (४०, रा. नागसेन कॉलनी, राेशनगेट) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. ते पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात बुधवारी दुपारी ३ वाजता आले. रिसेप्शनवरील महिला कर्मचारी मनीषा जगताप यांना पत्रकार असल्याचे सांगून, आयुक्त साहेबांना भेटायचे असल्याचे सांगितले. त्यांना थोडा वेळ बसण्यास सांगून जनसंपर्क अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे यांना घटनेची कल्पना दिल्यानंतर त्यांनी विचारपूस केली. रोडे यांच्याशी बोलताना त्यांनी अरेरावीची भाषा केली. तसेच रोडे यांना ते गोपनीय शाखेतील कागदपत्रांची व्हिडिओ शूटिंग मोबाइलमध्ये करीत असल्याचे दिसून आले.
रोडे यांनी मोबाइल ताब्यात घेतला असता, त्यात विनापरवानगी गोपनीय शाखेचे शूटिंग केल्याचे व्हिडिओ आढळून आले. पोलीस आयुक्त इमारतीचे व परिसराचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. याविषयीच्या सूचनाही कार्यालयात लावण्यात आलेल्या असताना थेट पोलीस आयुक्तांच्या दालनातच व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेबाबत मनीषा जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून सय्यद निहाल अहेमद सय्यद शकील अहेमद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.