वाळूज महानगर : सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिल्यामुळे आठवडाभरापूर्वी कमळापूर परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी अक्षय नाबदे (२०, रा.रांजणगाव) याच्याविरुद्ध अॅट्रासिटी व छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कमळापूर परिसरातील दिशा (१६, नाव काल्पनिक) ही दहावीच्या वर्गात शिकते. पूर्वी रांजणगावात राहत असताना तिच्या घराशेजारी राहणाऱ्या अक्षय नाबदेसोबत मैत्री झाली होती. अक्षयने दिशासोबत मोबाईलमध्ये फोटोही काढले होते. अक्षय वाईट सवयीचा असल्याचे लक्षात आल्याने तिने त्याच्याशी मैत्री तोडली. त्यानंतर तिचे कुटुंब कमळापूर परिसरात राहायला गेले. लॉकडाऊनच्या काळात अक्षय सतत तिच्या घराकडे चकराही मारत होता. डिसेंबरमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर ती शाळेत ये-जा करत असताना तो पाठलाग करायचा. तिने पालकाला ही माहिती दिली. त्यामुळे तिला शाळेत सोडवायला पालक येऊ लागले. १२ डिसेंबरला अक्षयने तिच्या पालकांनाच जिवे मारण्याची धमकी दिली होती.
माझ्यासोबत बोल नाही तर तुझ्यासोबत काढलेले फोटो फेसबुक व व्हॉटस ॲपवर व्हायरल करण्याची धमकी तो देऊ लागला. या छेडछाडीला कंटाळून दिशाने १७ जानेवारीला राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. पालकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. रुग्णालयातुन सुट्टी झाल्यानंतर दिशाने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अक्षय नाबदेविरुद्ध तक्रार दिली.