कडा: आष्टी तालुक्यातील कडा येथील हैद्राबाद बँकेच्या शाखेत चोरट्यांनी मागच्या बाजूने प्रवेश करुन स्ट्राँग रुमचे लोखंडी दार चक्क गॅस कटरच्या साह्याने कापले. मात्र बँकेची रक्कम तिसऱ्या रुममध्ये असल्याने त्यांना तिथ पर्यंत पोहचता आले नाही.कडा येथील स्टेट बँक आॅफ हैद्राबाद बँकेची शाखा असून त्या अंतर्गत वटणवाडी, शेरी, देवी निमगाव, शिरापूर, आनंदवाडी, सरटे वडगाव, नंदा, रुई नालकोल, कडा या गावांचा समावेश आहे. सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी बँकेची मागची खिडकी तोडून बँकेत प्रवेश केला. बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून स्ट्राँग रुमचे दोन दरवाजे चक्क गॅस कटरने कापले. बँकेची २० लाख रुपयांची कॅश तिसऱ्या रुममध्ये होती. तिसऱ्या रुममध्ये ते प्रवेश न करताच पळुन गेल्याने चोरीचा प्रयत्न फसला. सकाळी सफाई करणारी महिला रत्नमाला कापरे यांच्या लक्षात ही बाब आली त्यांनी लगेचच सदरील घटनेची माहिती शाखा व्यवस्थापक किशोर राजहंस यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. डॉग स्कॉड व एडीएसच्या पथकाने याची पहाणी केली. व्यवस्थापक राजहंस यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पहाट झाल्याने चोर गेले पळून ?हैद्राबाद बँकेतील दोन दरवाजे चोरांनी कापले मात्र तिसरा दरवाजा कापताना पहाट झाली असवी किंवा पोलिसांच्या सायरनचा आवाज आला असावा त्यामुळे चोरटे तिसऱ्या रुममध्ये प्रवेश न करताच पळुन गेले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी काढला आहे. (वार्ताहर)एसबीएचच्या शाखेत नेहमीच लाखो रुपयांची रक्कम असते मात्र बँकेची सुरक्षा वाऱ्यावर आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बँकेची सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. विशेष म्हणजे बँक अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल वरिष्ठांना नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. बँकेत सायरन नाही तसेच सुराक्षा गार्डही नाही. याला बँक व्यवस्थापक किशोर राजहंस यांनी दुजोरा दिला आहे. यामुळे बँकेची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे.
कड्यात बँक फोडण्याचा प्रयत्न
By admin | Published: November 26, 2014 12:23 AM