औरंगाबाद : नारेगाव येथील कचरा डेपोत महापालिकेने निव्वळ ४० वर्ष कचरा नेऊन टाकला. या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया केली नाही. स्वच्छ भारत मिशन अभियानाअंतर्गत रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी महापालिकेला हा कचरा नष्ट करावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येईल यावर काम सुरू केल्याची माहिती प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.
नारेगाव येथील नागरिकांनी चार वर्षांपूर्वी महापालिकेला कचरा टाकण्यास मज्जाव केला. शहरात अभूतपूर्व अशी कचरा कोंडी निर्माण झाली. शहराच्या आसपास कुठेही महापालिकेला कचरा टाकण्यासाठी जागा मिळाली नाही. शेवटी चिकलठाणा, पडेगाव आणि हर्सूल येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला. हा प्रयोग काही अंशी यशस्वी ठरला आहे. शहरातील कचऱ्याचा प्रश्न सुटला असला तरी नारेगावातील कचऱ्याचे डोंगर जशास तसे आहेत. या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने खंडपीठातही दिले होते. प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी पुन्हा एकदा नारेगाव येथील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने कशा पद्धतीने विल्हेवाट लावता येईल यावर काम सुरू केले आहे. लवकरच या कामाचे अंदाजपत्रक तयार करून कृती आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
डिसेंबर महिना कचरा वर्गीकरणासाठी
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाचे पथक स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी शहरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये कचरा वर्गीकरणावर सर्वाधिक भर देण्यात येईल. कचऱ्यासाठी यापूर्वी काम केलेल्या सीआरटी संस्थेला काही जबाबदारी सोपविल्याचे पांडेय यांनी नमूद केले.
व्यापाऱ्यांना डस्टबिन ठेवण्याची सक्ती
शहरात व्यापारी दुकानासमोर डस्टबिन ठेवत नाहीत. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याने दोन स्वतंत्र डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येईल आणि एक जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे प्रशासक पांडेय यांनी सांगितले.