औरंगाबाद : ग्रामीण भागातील ९ ते १२ वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरु झाले. तसेच शहरात ११ वी व १२ वीचे वर्ग सुरु करण्याची गेल्या आठवड्यात परवानगी मिळाली. त्यामुळे शहरात सोमवारी ९३ पैकी ४३ शाळा, महाविद्यालयात अकरावी व बारावीचे वर्ग भरले. त्यात अकरावीचे ७१२ तर बारावीचे १४०१ विद्यार्थी म्हणजे केवळ १४.६८ टक्केच विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. तुलनेत ग्रामीण भागातील उपस्थितीचा टक्का जास्त आहे. सोमवारपर्यंत ६२ शाळा महाविद्यालयातील ५९१ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर तपासणीत ८ जण बाधित आढळले.
शहरात ११६ महाविद्यालये आहेत. त्यात मनपा हद्दीत ९३ शाळा व महाविद्यालयात अकरावी व बारावीचे ३० हजार ७८९ विद्यार्थ्यांची नावनोंदणी आहे. त्यातील ६२ महाविद्यालयाची तपासणीची तर ४३ शाळांच्या उपस्थितीची सोमवारी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली. महापालिका हद्दीतील अकरावी व बारावीचे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग सुरु करण्याची परवानगी मनपा प्रशासकांनी गत आठवड्यात दिली. हे वर्ग सुरु करण्यासाठी सोमवारपर्यंत ११०७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर तपासणी करायची होती. त्यापैकी ६२ संस्थेतील ५९१ जणांनी तपासणी करुन घेतली. त्यात ७ शिक्षक व १ शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळले. प्राप्त माहितीनुसार ४३ महाविद्यालयात अकरावीचे ६ हजार ७४५ विद्यार्थी प्रवेशित असून त्यातील ७१२ विद्यार्थी सोमवारी उपस्थित होते. १२ वीचे ७ हजार ६४५ विद्यार्थी प्रवेशित असून त्यापैकी १४०१ विद्यार्थी सोमवारी उपस्थित होते. शहरात सर्वच महाविद्यालयांत अकरावीच्या विशेष फेरी सुरु आहे.
अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरुअद्याप अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तर बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्गात वाढत आहे. वर्गात जाण्यापूर्वी सॅनिटायझेशन, तापमान तपासनी, मास्क वापरावर महाविद्यालयाकडून लक्ष दिले जात असल्याचे विवेकानंद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर रामदास वनारे यांनी सांगितले.
उपस्थिती वाढतेयमहापालिका क्षेत्रात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी करुन अकरावी व बारावीचे वर्ग सुरु होत आहे. विद्यार्थी संख्याही वाढत आहे. ग्रामीण भागातही बऱ्यापैकी विद्यार्थी संख्या वाढली आहे, असे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.