औरंगाबाद : जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील नोकरीच्या अपेक्षेत असलेल्या उमेदवारांची संख्या वर्षानुवर्षे वाढतच चालली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत भरती होईल की नाही, या विवंचनेत अनुकंपाधारक आहेत. भरती झाली नाही, तर नवीन वर्षामध्ये सुरुवातीच्या एक- दोन महिन्यातच लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागेल. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील. परिणामी, मागील दहा वर्षांपासून अनुकंपाच्या रांगेत असलेल्या अनेक उमेदवारांवर नोकरीची वयोमर्यादा ओलांडण्याची वेळ येणार असून, प्रशासनाच्या वेळखाऊ धोरणामुळे अशा उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.
रखडलेल्या अनुकंपा तत्त्वावरील भरतीसंबंधी मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांनी खंत व्यक्त केली. दरवर्षी केवळ प्रतीक्षा यादीच अद्ययावत केली जाते. परंतु प्रत्यक्षात भरती प्रक्रिया राबविली जात नाही. डिसेंबर २०१५ मध्ये अनुकंपाधारकांपैकी ज्येष्ठता यादीनुसार अवघ्या ९ जणांची निवड करण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत भरतीच केलेली नाही. सध्या जि. प. सामान्य प्रशासन विभागाने १९२ अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी तयार केलेली आहे. ज्येष्ठता यादीनुसार भरती केली जाईल, असे सांगण्यात येते. मात्र, एकूण रिक्त पदांच्या १० टक्के जागा अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांसाठी राखीव ठेवल्या जातात. त्यामुळे अवघ्या १०-१५ उमेदवारांना नोकरी देऊन ती यादी गुंडाळली जाते.
यासंदर्भात अनुकंपाधारक म्हणाले की, मागील दहा वर्षांपासून आम्ही अनुकंपा तत्त्वावरील नोकरीच्या प्रतीक्षेत आहोत. डिसेंबरअखेरपर्यंत ही भरती झाली, तर आम्हाला नोकरी मिळू शकते. अन्यथा जानेवारी- फेब्रुवारीपर्यंत केव्हाही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यापुढे विधानसभेच्या निवडणुका लागतील. त्यामुळे अनुकंपा भरती होणार नाही. परिणामी, अनुकंपाधारकांपैकी अनेक जण नोकरीसाठी आवश्यक वयोमर्यादा ओलांडतील. परिणामी, कुटुंबावर उपासमारीचे संकट कोसळणार आहे. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडणाऱ्या पात्र अनुकंपाधारकांना लवकरात लवकर जिल्हा परिषदेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.