औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मे महिन्यात घेतलेल्या विधी शाखेच्या परीक्षांचे निकाल अजूनही जाहीर झालेले नाहीत. दुसरीकडे, वकिली व्यवसाय करण्यासाठी देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या ‘ऑल इंडिया बार इक्झामिनेशन’ या परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख १५ जुलै होती. मात्र, निकाल न लागल्यामुळे अंतिम वर्षाच्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता आले नाहीत.
विद्यापीठाने मे महिन्यात विधी शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षाची ऑनलाइन परीक्षा घेतली होती. तथापि, प्रथम वर्षाचे प्रवेश उशिरा झाल्यामुळे या वर्षाची परीक्षा जूनच्या शेवटच्या सुरू झाली व ती जुलैच्या पहिल्या आठवड्यात संपली. द्वितीय व तृतीय वर्षांचे निकाल तयार आहेत; परंतु अगोदर प्रथम वर्षाचे निकाल जाहीर केल्याशिवाय पुढील वर्षांचे निकाल जाहीर करता येत
नाहीत, असा पवित्रा विद्यापीठाने घेतला आहे.
विशेष म्हणजे, अन्य पारंपरिक अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांना गुरुवारपासून (२९ जुलै) सुरुवात होणार असून, विधी शाखेच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांचाच निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. या विद्यार्थ्यांकडून अजून दुसऱ्या सहामाही परीक्षांसाठी अर्जही मागविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
चौकट...............
ऑल इंडिया बार परीक्षा
कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर वकिली व्यवसाय करण्यासाठी ऑल इंडिया बार परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते. विधी विद्याशाखेचे पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागते. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षातील विद्यार्थी देखील ही परीक्षा देऊ शकतात. ही परीक्षा राष्ट्रीय पातळीवर आयोजित केली जाते.
चौकट............
आठवडाभरात लागतील निकाल
यासंदर्भात विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी सांगितले की, विधी शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षेचे निकाल तयार आहेत; परंतु प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा उशिरा झाल्यामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब झाला. आठवडाभरात या शाखेच्या सर्वच वर्षांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.