सुनील घोडके
खुलताबाद : खुलताबाद तालुक्यात २५ ग्रामपंचायतींतील निवडणूक शिगेला पोहोचली. प्रत्येक गावचा कारभार हाती राहावा म्हणून अनेक जिल्हा व तालुकास्तरीय पुढाऱ्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. काही मातब्बरांनी पत्नी, भाऊ, मुलाला निवडणुकीत उतरविले आहेत. या लढतीकडे खुलताबाद तालुक्याचे लक्ष लागून आहे.
तालुक्यातील गल्लेबोरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ खोसरे हे दोन प्रभागात आपले नशीब आजमावत आहेत. प्रभाग क्रमांक दोनमध्ये त्यांची लढत रामदास चंद्रटिके तर प्रभाग क्रमांक चारमध्ये विशाल विजय खोसरे यांच्यासोबत असून या दोन्ही प्रभागांत अनुक्रमे ७६३ व ७२० मतदार आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून गल्लेबोरगाव ग्रा.पं. आपल्या ताब्यात ठेवत चौथ्यांदा ताब्यात घेण्यासाठी जगन्नाथ खोसरे यांनी कंबर कसली आहे.
माजी जि. प. सदस्या सुनिता विलासराव चव्हाण या वडोद बु. ग्रामपंचायतच्या निवडणूक रिंगणात उतरल्या असून प्रभाग क्रमांक दोन ओबीसी महिला प्रवर्गासाठी असलेल्या जागेसाठी त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांची लढत स्नेहल आशिष संगवे यांच्याशी होत आहे. या ठिकाणी ६९५ मतदार आहेत. कनकशीळ-इंदापूर ग्रुप ग्रामपंचायतीत इंदापूर येथील मनसेचे तालुकाध्यक्ष अविराज निकम व भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप निकम पाटील या दोन सख्ख्या चुलतभावांत लढत होत आहे. या ठिकाणी ५६० मतदार आहेत. या ठिकाणच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
माजी उपसभापती वेरूळच्या निवडणूक रिंगणात
वेरूळ ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रंमाक तीनमध्ये माजी उपसभापती व माजी उपसरपंच विजय भालेराव हे निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांच्याविरोधात अंकुश कणसे तसेच सिंधू राजू खरे व अन्य दोन उमेदवार आहेत. औरंगाबाद येथील हडको परिसरातील राजू खरे यांनी आपल्या पत्नीस वेरूळ ग्रामपंचायतीत उतरविल्याने या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या ठिकाणी ११०० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गदाणा गटाचे जि. प. सदस्य प्रा. सुरेश सोनवणे यांनी आपले गाव सोनखेडा येथे पत्नी ललिता सोनवणे व भाऊ मनोज सोनवणे यांना निवडणूक मैदानात उतरविले आहे. त्यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याची औपचारिकता बाकी आहे. एकंदरीत गावातील सत्ता आपल्याच ताब्यात रहावी, यासाठी मातब्बर पुढारी या ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत.