छत्रपती संभाजीनगर : अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या वसीम व साेहेल भावंडांनी मोठ्या कष्टाने कुटुंबाचा गाडा हाकत रुळावर आणला होता. पंधरा वर्षांपूर्वी किरकोळ कारणातून त्यांच्या वडिलांची हत्या झाली. त्या दु:खातून सावरत दोन्ही भावांचे विवाह झाले. आई हमीदा नातवंडामुळे दु:ख विसरून संसारात पुन्हा रमत होत्या. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत होती. सुखी संसाराची गाडी आता कुठे रुळावर येत असतानाच नियतीने संपूर्ण कुटुंबावर घाला घातला.
वसीम व सोहेल यांचे दोन काका पडेगावात तर एक काका पेन्शनपुऱ्यात राहतात. दाेन मामा जिन्सीत राहतात. पंधरा वर्षांपूर्वी वडिलांच्या हत्येनंतर दोन्ही भावांचे नोकरीच्या शोधात शिक्षण सुटले. मात्र मिळेल ते काम करून दोघांनी घराची आर्थिक परिस्थिती सुधारली असे सांगताना त्यांच्या मामेबहीण मोहसीना यांना अश्रू अनावर झाले होते. दोन्ही भावांचा दूध व वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. पेन्शनपुऱ्यातील घर लहान पडत असल्याने आठ महिन्यांपूर्वीच ते दानाबाजार येथे किरायाने राहण्यास आले होते.
माहेरी ‘ईदी’ देऊन पत्नी सायंकाळी परतलीवसीम यांनी मंगळवारी सायंकाळी कुटुंबासाठी ईदनिमित्त कपडे व अन्य साहित्य खरेदी केले होते. वसीम यांची पत्नी तन्वीर यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांची आई एकटीच दौलताबादमध्ये राहते. मंगळवारी तन्वीर मुलांसह आईकडे रमजाननिमित्त ‘ईदी’ घेऊन गेल्या होत्या. आईला भेटून आनंदात सायंकाळी घरी परतल्या आणि काही तासांत काळाने त्यांच्यावर घाला घातला.
मृत्यूविषयी ओळींचे स्टेटस आणि पाच तासांनी मृत्यूवसीम व पडेगावमध्ये राहणारा चुलत भाऊ शेख समीर हे दोघे मंगळवारी सायंकाळी बराच वेळ सोबत होते. त्यांच्यात बराच वेळ थट्टामस्करी झाली. ईदचे नियोजन ठरले. रात्री १० वाजता वसीम यांनी व्हॉट्सॲप स्टेटसला मृत्यूविषयी ओळी ठेवल्या होत्या.‘हम बडी अझियत में हैं, दिन बा दिन जिंदगी हाथों से निकल जा रहीं है,और पता नहीं कब या अल्लाह तेरा बुलावा आये...’या नेमक्या मृत्यूविषयीच्या विचारानंतर पुढील पाच तासांत त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला मृत्यूने कवटाळल्याने अनेकांना धक्का बसला.
मुलींच्या दु:खातून सावरले होते, पण सुख टिकले नाहीवसीम यांचा लहान भाऊ सोहेल यांच्या पत्नीचे आई, वडील नेवासा येथे वास्तव्यास असतात. रेश्मा यांच्या दोन वर्षांपूर्वी जुळ्या मुली जन्मत:च दगावल्या होत्या. त्यातून दोघेही अशातच सावरले होते. रेश्मा पुन्हा आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. मे महिन्यात बाळ होण्याच्या आनंदात ते होते. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. शेख कुटुंबाच्या असंख्य अपूर्ण स्वप्नांचा बुधवारी पहाटे वेदनादायी शेवट झाला.