औरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्यांकडून बालकांवर हल्ले सुरूच आहेत. पाचवर्षीय बालिकेचे लचके तोडल्याच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी, रविवारीदेखील कुत्रा चावल्यामुळे तीन बालकांवर घाटी रु ग्णालयात उपचार करण्यात आले. मोकाट कुत्र्यांनी वर्षभरात चार हजार जणांना चावा घेतला. यामध्ये ५० टक्क्यांवर बालकांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शहरात गेल्या वर्षभरापासून मोकाट कुत्र्यांकडून नागरिक, मुले, महिलांवर हल्ला होण्याच्या घटना होत आहेत. विशेषत: मोकाट कुत्र्यांकडून लहान मुलांवर हल्ला होण्याचे प्रकार अधिक आहेत. सहा ते आठ कुत्र्यांच्या टोळीने पाचवर्षीय बालिकेचे लचके तोडल्याची घटना शनिवारी दुपारी सूतगिरणी परिसरातील मैदानावर घडली. यावेळी नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावल्याने बालिका बचावली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी रविवारी सिडको, एन-२ येथील ११ वर्षीय, आसेफिया कॉलनीत ५ वर्षीय, तर जयसिंगपुरा येथील ८ वर्षीय बालकाला कुत्र्याने चावा घेतल्याने उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. यामध्ये एका बालकाला कुत्र्याच्या लहान पिल्लाने चावा घेतल्याची माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली. त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक २४ मध्ये उपचार करण्यात आले. याशिवाय ६ मोठ्या व्यक्तींनीही कुत्रा चावल्यामुळे रविवारी घाटीत धाव घेतली. त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक ६ मध्ये उपचार करण्यात आले.
शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत असताना त्याकडे मनपाचे लक्ष जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील रस्तोरस्ती, चौकाचौकात मोकाट कुत्र्यांच्या झुंडी दिसून येतात. दिवसा आणि रात्री ये-जा करणाऱ्या नागरिकांवर, दुचाकीचालकांवर मोकाट कुत्र्यांकडून हल्ला केला जात आहे. वारंवार मागणी करूनही कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
कुत्र्यांच्या रूपाने बालकांवर संकटमोकाट कुत्र्यांच्या रूपाने शहरातील बालकांवर संकट निर्माण झाले आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या जखमेत रेबीजचे विषाणू असतात. रेबीजच्या विषाणूंना तातडीने नियंत्रणात न आणल्यास ते मेंदूपर्यंत जातात आणि रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे रुग्णांना तातडीने अॅन्टी रेबीज सिरम (एआरएस) देणे आवश्यक असते. त्यानंतर रुग्णांना अॅन्टी रेबीज व्हॅक्सिन (एआरव्ही) दिली जाते. घाटी रुग्णालयात तब्बल वर्षभरापासून ‘एआरव्ही’ उपलब्ध नाही. लसीसाठीही थेट मेडिकलचा, मनपाचा रस्ता दाखविला जातो. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची परवड होत आहे. घाटीने मनपाकडे रेबीस लसींची मागणी केली आहे.
मनपाकडे लसींची मागणीघाटीत गेल्या वर्षभरात श्वानदंशाच्या चार हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये ५० टक्क्यांवर बालकांचा समावेश होता. रविवारी आठ जण दाखल झाले. यात दोन बालकांचा समावेश होता. महापालिकेकडे रेबीज लसीची मागणी करण्यात आली आहे.- डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक, घाटी रुग्णालय