औरंगाबाद : जिल्ह्यातील बाधितांची संख्या दररोज ३० ते ४० झाल्याने एकूण सक्रिय रुग्णसंख्या आटोक्यात येत २८ जानेवारीला ९१ झाली होती. मात्र, गेल्या पंधरवड्यात सक्रिय रुग्णसंख्येची वाटचाल पुन्हा तिहेरी आकड्याने सुरू असून ५० पेक्षा अधिकने दररोज रुग्ण वाढत आहे. गेल्या ६ दिवसांत ४४० रुग्णांची भर पडली. ४ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सक्रिय रुग्णांची संख्या ४०७ वर पोहचली आहे.
पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. १५ फेब्रुवारीपासून वरिष्ठ महाविद्यालयांत पदवीचे प्रत्यक्ष वर्ग भरायला सुरुवात झाली. शाळांमध्ये नियमांचे काहीसे पालन होत आहे. मात्र, महाविद्यालये, विविध कार्यक्रम, पक्षांचे मेळावे, संगीत, पुस्तक प्रकाशन सोहळे, लग्नसमारंभ, बाजारपेठांत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून मास्कच्या वापराकडे दुर्लक्ष होत आहे. विभागीय वार्षिक योजनेच्या बैठकीनिमित्त शहरात आलेल्या मंत्री, नेत्यांच्या उपस्थितीत अनेक राजकीय बैठका, कार्यक्रम पार पडले. मनपाकडून दररोज दंडात्मक कारवाई केली जात असतांना नाका तोंडावरचा मास्क केवळ हनुवटीवर लावून फिरणारे, घोळक्यातील रंगलेले गप्पांचे फड ठिकठिकाणी दिसताहेत. दुसरीकडे जिल्ह्यात सुरू कोरोना लसीकरणाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
---
दिनांक : बाधित रुग्ण
--
११ फेब्रुवारी -६६
१२ फेब्रुवारी -७१
१३ फेब्रुवारी-५८
१४ फेब्रुवारी -५८
१५ फेब्रुवारी -७७
१६ फेब्रुवारी -१२०