औरंगाबाद : शहरातील मोफत चमकोगिरीला महापालिकेने चांगलीच वेसण घातली आहे. महापुरुष, मोठ्या राजकीय नेत्यांच्या जयंतीनिमित्त ७८ दिवसच होर्डिंग लावण्याची परवानगी महापालिका देणार आहे. होर्डिंग लावणाऱ्याला दोन दिवसांची परवानगी असेल. पोलीस आणि महापालिकेने ज्याठिकाणी होर्डिंग लावण्याची परवानगी दिली तेथेच होर्डिंग लावता येईल. होर्डिंगची जागा बदलणे, परवानगीव्यतिरिक्त जास्त दिवस होर्डिंग लावलेली दिसल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
महापालिकेने मागील आठ दिवसांमध्ये चार जणांवर बेकायदेशीर होर्डिंग लावल्याबद्दल गुन्हेसुद्धा दाखल केले आहेत. महापालिकेच्या या भूमिकेचे सर्वसामान्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. यापुढेही शहर विद्रूप होऊ नये यासाठी महापालिकेने डोळ्यात तेल ओतून काम करावे, अशी औरंगाबादकरांची इच्छा आहे. मागील सर्वसाधारण सभेत होर्डिंगच्या धोरणाला मंजुरी देण्यात आली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी वेगवेगळ्या पक्षांच्या गटनेत्यांकडून कोणत्या दिवशी होर्डिंगला परवानगी द्यावी याची यादी मागितली. यादीची तपासणी करून ७८ दिवसच शहरात होर्डिंग लावण्यास अंतिम मान्यता देण्यात आली. ही यादीही शुक्रवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना सादर करण्यात आली.
दिवाळी, दसरा, ईद आदी उत्सवसार्वजनिक उत्सव, जयंतीसाठी शहरात मोठ्या प्रमाणात होर्डिंग लागतात. त्यासाठी आता इच्छुकांना महापालिकेची परवानगी घ्यावी लागेल. उत्सवाचा आणि त्यानंतरचा दुसरा दिवस, असे एकूण दोन दिवसच परवानगी देण्यात येईल. होर्डिंगचा आकार, त्यावरील मजकूरही मनपाला सादर करावा लागेल. मनपाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच होर्डिंग लावता येईल.
७८ दिवस कोणते?सावित्रीबाई फुले जयंती, प्रजासत्ताक दिन, शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार), संत गाडगे महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शाहू महाराज जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, स्वातंत्र्य दिन, महावीर जयंती, बकरी ईद, रमजान ईद, गणेशोत्सव, दसरा व नवरात्री, दिवाळी, महापरिनिर्वाण दिन, गुरुनानक जयंती, ख्रिसमस-नाताळ, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती, खा. चंद्रकांत खैरे वाढदिवस, राष्टÑमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद, महाशिवरात्री, शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार), धूलिवंदन, गुढीपाडवा, गुड फ्रायडे, हनुमान जयंती, जोतिबा फुले जयंती, मकरसंक्रांत, विद्यापीठ नामविस्तार दिन, महात्मा बसवेश्वर जयंती, अक्षय तृतीया, ईद-ए-मिलादुन्नबी, महाराष्ट्र-कामगार दिन, रवींद्रनाथ टागोर जयंती, धर्मवीर संभाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे), विलासराव देशमुख जयंती, स्वातंत्र्यवीर सावरकर, अहिल्याबाई होळकर, शिवसेना वर्धापन दिन, महाराणा प्रतापसिंह जयंती, धर्मवीर संभाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे), शिवराज्याभिषेक उत्सव दिन, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस, संत कबीर जयंती, वसंतराव नाईक, गुरुपौर्णिमा, लोकमान्य टिळक, आषाढी एकादशी, पतेती, नारळी पौर्णिमा, रामनवमी, रक्षाबंधन, राजीव गांधी जयंती, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन, मोहर्रम, महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री, महर्षी वाल्मीक जयंती, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, महापालिका वर्धापन दिन, श्रीदत्त जयंती, संत सेवालाल महाराज जयंती, बुद्धपौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गौसे-आजम दस्तगीर, भगवान परशुराम जयंती, पारसी नववर्ष, संत रोहिदास, संत झुलेलाल महाराज, संत गोरोबा काका जयंती, आदित्य ठाकरे, आ. संजय शिरसाट वाढदिवस.