औरंगाबाद : मागील वर्षी हरभरा व हरभरा डाळीला उच्चांकी भाव मिळाला होता. यामुळे यंदा शेतकर्यांनी रबी हंगामात ज्वारी, गव्हावरील लक्ष कमी करून १८६.४२ टक्के हरभर्याची पेरणी केली. मात्र, नवीन हरभरा हाती येण्यास आणखी दोन महिन्याचा अवधी बाकी असताना बाजारात मात्र, आतापासूनच हरभरा डाळीचे भाव गडगडण्यास सुरुवात झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे मार्चपर्यंत शेतकर्यांच्या हाती हरभरा पीक येईपर्यंत योग्य भाव मिळावा म्हणून सरकारने ३० टक्के आयात शुल्क लावले. मात्र, भाव वाढण्यापेक्षा कमी झाले.
औरंगाबाद विभागात औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्याचा समावेश आहे. येथे ६ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ३० हजार ९२८ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात ७६.६७ टक्के, जालन्यात ११०.८० टक्के तर बीड जिल्ह्यात १००.२८ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणीच्या बाबतीत औरंगाबाद जिल्हा मागे आहे. कृषी अधिकार्यांच्या मते ८५-८८ टक्क्यांपर्यंतच औरंगाबाद जिल्ह्यात रबीची पेरणी पूर्ण होईल. यंदा तिन्ही जिल्ह्यांतील शेतकर्यांनी गहू,ज्वारीऐवजी हरभरा पिकाला अधिक प्राधान्य दिले. कारण हरभर्याला एक ते दोन पाण्याच्या पाळ्या दिला तरी पीक चांगले येते. रोग पडण्याचा धोकाही कमी असतो. यामुळेच जिथे सरासरी १ लाख १७ हजार ४२८ हेक्टरवर हरभर्याचे पीक घेतल्या जात तेथे आजमितीपर्यंत २ लाख १८ हजार ९१५ हेक्टरवर हरभरा पेरणी पूर्ण झाली आहे. म्हणजेच तब्बल १८६.४२ टक्के आजपर्यंतची सर्वाधिक पेरणीची नोंद झाली आहे. डाळीचे व्यापारी नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, मागील वर्षी आॅगस्ट २०१६ दरम्यान हरभरा डाळ ९००० ते ९५०० रुपये तर हरभरा ७००० ते ७५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकला होता.
यामुळे शेतकर्यांनी हरभर्याच्या पेरणीकडे आपले लक्ष केंद्रित केले. अशीच परिस्थिती देशभरातील आहे. यामुळे पुढील वर्षी हरभराचे बंपर उत्पादन होणार हे आता निश्चित झाले आहे. याचा विचार करून केंद्र सरकारने २१ डिसेंबर रोजी ३० टक्के आयात शुल्क वाढवून टाकले. पण याचा क्षणिक परिणाम जाणवला, पण पुन्हा क्विंटलमागे १ हजार रुपयांनी भाव गडगडले. सध्या हरभरा ३८०० ते ४१५० रुपये तर हरभरा डाळ ५००० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल विकत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हरभरा व डाळीचे भाव निम्मेच झाले आहेत. यंदा नवीन हरभरा येण्याआधीच भाव गडगडल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.
सात राज्यांत हरभरा पीक देशात महाराष्ट्रासह राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या सात राज्यांत मोठ्या प्रमाणात हरभरा पीक घेतल्या जाते. दरवर्षी सुमारे ६५ लाख टन हरभरा देशाभरात पिकविला जातो. तरीही हरभर्याची मागणी कायम असते. त्यामुळे दरवर्षी आॅस्ट्रेलिया आणि टांझानिया येथून सुमारे २० लाख टन हरभरा भारतात आयात केला जातो. देशात हरभराचे बंपर उत्पादन होणार हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने आयातीवर ३० टक्के शुल्क लावले आहे. सरकारने हरभर्याला ४४०० रुपये प्रतिक्विंटल किमान मूल्य दर (एमएसपी) काढला आहे; पण बाजारात हरभर्याचे भाव ३८०० रुपयांपर्यंत खाली येऊन ठेपले आहेत.