औरंगाबाद : महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प गुजरातकडे जात असल्याने राजकीय वातावरण तापलेले आहे. आता औरंगाबादेतील विमानसेवाही पळविण्यात आली आहे; परंतु त्याकडे कोणाचेही लक्ष जात नसल्याची परिस्थिती आहे. औरंगाबादेत नावालाच राहून ईशान्य भारतातील शहरांच्या सेवेत एका कंपनीचे विमान ‘उड्डाण’ घेत आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांनंतर नव्या विमानसेवेचे १ जून रोजी ‘टेक ऑफ’ झाले. या दिवशी मोठा गाजावाजा करून फ्लायबिग एअरलाईन्सने सकाळच्या वेळेतील हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा सुरू केली. या नव्या विमानसेवेमुळे सकाळी हैदराबादला जाऊन सायंकाळी औरंगाबादला परत येणे शक्य झाले, मात्र, फ्लायबिग एअरलाईन्सची हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद विमान सेवा अचानक ऑगस्टच्या प्रारंभी दीड महिन्यांसाठी रद्द करण्यात आली. या कालावधीनंतर तरी विमानसेवा सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना पुढे आणखी महिनाभर या विमानाचे उड्डाण नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले. आता ऑक्टोबर महिना उलटूनही ही विमानसेवा पुन्हा सुरू होण्याचे कोणतेही संकेत नाहीत. औरंगाबादेतील विमान कोलकाता, गुवाहाटी, आगरतळा, पटणा यांसह ईशान्य भारतातील शहरांसाठी वापरले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
फ्लायबिग एअरलाईन्सचे अधिकारी म्हणाले...औरंगाबादेतील विमानसेवा पुन्हा केव्हा सुरू होणार, या संदर्भात फ्लायबिग एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तेव्हा औरंगाबादेतील विमानसेवा बंद करण्यात आलेली नाही. एअरलाईन्सचे ऑफिसचे साहित्य विमानतळावरच आहे. औरंगाबादहून लवकरच पुन्हा विमानसेवा सुरू केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुण्याला विमान कधी?औरंगाबादहून हैदराबादपाठोपाठ पुणे, बंगळुरू, तिरूपतीसाठी विमानसेवा सुरू केली जाईल, अशी घोषणा फ्लायबिग एअरलाईन्सच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी करण्यात आली होती. मात्र, आजही प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी बस आणि रेल्वेचाच आधार घ्यावा लागत आहे. पुण्याला विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे.