औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावरून २५ आॅक्टोबरपासून मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी पूर्वीप्रमाणे एअरबस उड्डाण सुरू करण्याचे नियोजन इंडिगोने केले आहे, तसेच उदयपूर आणि अहमदाबादसाठीही नवी सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मार्चपासून विमानसेवा बंद होती. तीन महिन्यांनी १९ जूनपासून इंडिगोने दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली या मार्गावर उड्डाण सुरू केले. त्यानंतर १५ जुलैपासून इंडिगोने हैदराबादसाठीही विमानसेवा सुरू केली आहे. एअर इंडियानेही आता दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली सेवा सुरू केली आहे. हिवाळी शेड्यूलमध्ये इंडिगोने आता २५ आॅक्टोबरपासून मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबादसाठी १८० आसन क्षमतेच्या, तर उदयपूर आणि अहमदाबादसाठीही छोट्या विमानाद्वारे (एटीआर) नवी सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी यास दुजोरा दिला. पर्यटनाच्या राजधानीतून २१ वर्षांनंतर उदयपूरसाठी १६ आॅक्टोबर २०१९ रोजी एअर इंडियाने विमानसेवा सुरू केली होती. ही सेवा सध्या बंद आहे; परंतु आॅक्टोबरपासून या मार्गासह एअर इंडियाची मुंबई-औरंगाबाद-दिल्ली विमानसेवाही सुरू होणार आहे.
विमानसेवा होईल पूर्ववत२०१९ मध्ये हिवाळ्यात ज्याप्रमाणे विमानसेवा सुरू होत्या, त्याचप्रमाणे विमानसेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. कोरोनामुळे काही अडथळा आला नाही तर नियोजनाप्रमाणे औरंगाबादची विमानसेवा पूर्ववत होईल.- सुनीत कोठारी, उद्योजक